डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला आरोपींचे रेखाचित्र तयार करण्यास एक वर्ष लागले आहे. त्यांनी मंगळवारी डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्याचे रेखाचित्र जारी केले असून ते अधिक स्पष्ट असल्याचा दावा केला आहे.
पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी डॉ. दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या केली होती. या गुन्ह्य़ाचा तपास सुरुवातीला पुणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाबरोबरच राज्यातील विविध तपास यंत्रणांनी केला. या गुन्ह्य़ात सुरुवातीला दोन आरोपींची रेखाचित्र तयार करण्यात आली होती. त्याबरोबरच विविध शक्यतांवर तपास केला, तरीही आरोपींचा माग लागला नाही. या गुन्ह्य़ात पिस्तुलाच्या बॅलेस्टीकच्या अहवालावरून मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना अटक करण्यात आली. पण, त्यांच्याविरुद्ध पुरावा न आढळून आल्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे या गुन्ह्य़ाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली.
 याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून या गुन्ह्य़ाचा तपास मे २०१४ ला सीबीआयकडे देण्यात आला.
या गुन्ह्य़ाचा तपास मुंबईतील सीबीआयच्या गुन्हे शाखेची पथके करीत आहेत. या गुन्ह्य़ात सीबीआयने पुणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासाची कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास केला. तसेच, या प्रकरणात कुटुंबातील व्यक्तींकडून माहिती घेतली.