एकाच मोबाइल क्रमांकावरून अनेकांच्या परवान्यासाठी वाहन चाचणीची वेळ घेतल्याप्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी ११२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे अधिकृत प्रतिनिधी दोषी नसताना कारवाई होत असल्याबद्दल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेतली. निर्दोष व्यक्तींवर कारवाई होणार नसल्याची दक्षता घेतली जाईल, असे पाटील यांनी सांगितले. असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, सचिव यशवंत कुंभार, राज्य वाहन चालक-मालक संघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी पाटील यांची भेट घेऊन बाजू मांडली. अर्जासाठी ऑनलाईन संकेतस्थळ काही दिवसांपूर्वी रात्री बाराला सुरू होत असे. अर्ज भरताना अर्जदाराने मोबाईल क्रमांक दिल्यावर पासवर्ड मिळतो व दोनच मिनिटात हा पासवर्ड टाकून अर्ज द्यावा लागतो, अन्यथा तो बाद होतो. ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी रात्री अर्जदाराला त्रास देण्याऐवजी स्वत:चा किंवा परिचिताचा मोबाइल क्रमांक देत होते. त्यामुळे एकाच मोबाइलवरून अनेकांच्या चाचणीच्या वेळा घेतलेल्या दिसतात. दोषींवर कारवाई व्हावी, मात्र अशा प्रकरणामध्ये दोषी नसलेल्या प्रतिनिधींवर गुन्हे दाखल होणे योग्य नसल्याचे घाटोळे यांनी सांगितले.