पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावर रिक्षातून जुन्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलेसह पोलिसांनी आणखी एकालादेखील ताब्यात घेतले आहे. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांकडून पोलिसांनी १ कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.

फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावर दोघे जण जुन्या नोटा बदली करण्यासाठी येणार असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी गीता शहा आणि छगन राऊत हे रिक्षातून बॅगेसह उतरले. हे दोघे दिसताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. तेव्हा त्यांच्याकडे १ कोटी रुपयांच्या जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. गीता शहा या येरवडा परिसरात राहणाऱ्या असून त्यांचा व्यवसाय आहे. तर छगन राऊत हा चपलांचा व्यापारी आहे.