वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा धसका

पुणे शहर पोलीस दलात गेल्या काही दिवसांत मोठे फेरबदल झाले आहेत. शिस्तीच्या भोक्त्या अशी ख्याती असलेल्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी पोलीस प्रशासनावर मोठी पकड ठेवली आहे. त्यांचा दरारा आणि धसक्यामुळे आषाढ महिन्यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात रंगणाऱ्या सामिष भोजनाच्या ‘आखाड पाटर्य़ा’ यंदा बंद पडल्या आहेत.

पोलीस आयुक्त शुक्ला आणि सहपोलीस आयुक्त रामानंद यांनी गेल्या काही दिवसांत पोलीस दलात मोठे बदल केले आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशामुळे शहरातील अनेक अवैध धंदे बंद पडले आहेत. अवैध धंद्यांना पाठबळ देणे काही पोलिसांनाही महागात पडले आहे. काही पोलीस ठाण्यांचे ‘अर्थकारण’ सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट पोलीस मुख्यालयाचा रस्ता दाखविण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. वरिष्ठांनी केलेल्या कारवाईचा धसका पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये रंगणाऱ्या ‘आखाड पाटर्य़ा’ यंदा बंद पडल्या आहेत. पोलीस ठाण्यांच्या आवारात केल्या जाणाऱ्या पाटर्य़ासाठी पोलीस वर्गणी काढतात. काही पोलीस ठाण्यांच्या आवारात तर मंडप टाकून पाटर्य़ा केल्या जातात. काही ठिकाणी या पाटर्य़ासाठी प्रायोजकही पुढे येतात. पोलीस ठाण्यांबरोबरच पोलीस चौक्यांच्या पातळीवरही अशा पाटर्य़ा रंगतात.

मात्र, यंदाच्या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे अशा पाटर्य़ा न करणे चांगले. पार्टीची बातमी वरिष्ठांपर्यंत पोचली तर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती असल्याने अनेक ठिकाणी यंदा पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले नाही, अशी माहिती काही पोलिसांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. अशा पाटर्य़ामध्ये घडणारे किस्सेही पुढे चर्चिले जातात. असा एखादा किस्सा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचला तर नाहक कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यापेक्षा पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊन हॉटेलमध्ये वैयक्तिक पातळीवर पाटर्य़ा आयोजित करण्यावर अनेक पोलिसांनी यंदा भर दिला आहे, असेही सांगण्यात आले.

‘आखाड पार्टी’ म्हणजे?

‘आखाड पाटर्य़ा म्हणजे एकप्रकारचे पोलिसांचे ‘गेटटुगेदर’ असते. ‘ऑन डय़ूटी २४ तास’ असे पोलिसांच्या कामाचे स्वरुप असते. त्यामुळे पोलिसांना पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र येऊन एखादा उपक्रम राबविणे शक्य होत नाही. त्या तुलनेत अन्य शासकीय कार्यालयात आठ तासांची सेवा करणारे कर्मचारी अन्य अनेक उपक्रम कामाच्या वेळात राबवत असतात. इतर सरकारी खात्यांच्या तुलनेत कामावर असताना अन्यत्र जाणे पोलिसांना महागात पडते.