माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

राजवट बदलली की वेगवेगळ्या प्रकारचे न्याय मिळतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे. सरकारकडून ‘गो स्लो’ असे सांगितल्यानंतर तपास यंत्रणांकडून न्यायालयात योग्य पुरावे सादर केले जात नाहीत. परिणामी सरकारी पक्षाकडून खटला चांगल्या पद्धतीने मांडलाच गेला नाही तर न्यायालय काय निकाल देणार? अशी टिप्पणी करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यायपालिकांवर राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोप शनिवारी केला.

परिवर्तन युवा परिषदेच्यावतीने आयोजित ‘तरुणांनी राजकारणात का यावे?’ या विषयावरील चर्चासत्रात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. खासदार राजू शेट्टी हेही या चर्चासत्रात सहभागी झाले होते. सहकार, राजकारण, कर्जमाफी, समाजमाध्यमे अशा विविध विषयांवर दोघांनीही परखड मते व्यक्त केली. प्रत्येक तरुणाने आधी समाजकारणात आले पाहिजे. देशात घडणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर आपले स्वत:चे असे एक मत बनवावे आणि ते मत ठामपणे सार्वजनिक ठिकाणी मांडावे. त्यातून आवड निर्माण झाल्यास राजकारणात यावे. राजकारण म्हणजे एक मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काम करणे नव्हे. अलीकडच्या काळात संपत्तीचे ओंगळवाणे दर्शन घडवणारे मोठे विवाहसोहळे करणे ही फॅशन झाली आहे. अशा समाजभान विसरलेल्या लोकांना समाजाने वाळीत टाकले पाहिजे, असे चव्हाण यांनी सांगितले. न्यायपालिकांवर होणारा राजकीय हस्तक्षेप हा गंभीर प्रकार असून तो देशासाठी घातक आहे, असेही ते म्हणाले.

शेट्टी म्हणाले, सरकारच्या प्रत्येक धोरणाबाबत आपले सकारात्मक-नकारात्मक काहीतरी मत असले पाहिजे. माझ्यातला मी विसरून समाज, देश म्हणून संबंधित प्रश्नाकडे पाहता यायला हवे. राजकारण वाईट व गटारगंगा आहे अशा प्रकारची नकारात्मक भूमिका नसावी, असे वाटते. सर्व निर्णय राजकारणीच घेतात. त्यामुळे राजकारणी वाईट असू शकतील, तर मग चांगले राजकारणी कसे असू शकतात हे दाखवून देण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावे.

राजकारणी, प्रशासनातले भ्रष्ट नोकरदार, पोलीस अधिकारी असे कोणीही गैरमार्गाने सार्वजनिक उपक्रमांना पैसे देत असतील तर त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देता कामा नये, असे शेट्टी यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या सहकाराचे गुजरातने अनुकरण केले आणि ते राज्य आज सहकारात अग्रक्रमावर आहे,  या उलट महाराष्ट्रात सहकार म्हणजे राजकारणाचे अड्डे झाल्याने सहकारक्षेत्राचे वाटोळे झाले. सहकार आणि राजकारण एकत्र करता येत नाही. सहकारक्षेत्रातील धुरिणांनी केवळ सहकारावरच लक्ष केंद्रित करावे. सहकारातून राजकारण करणाऱ्यांनी त्या क्षेत्राची वाट लावल्याचे अनेक दाखले शेट्टी यांनी या वेळी दिले.