कायमस्वरूपी उड्डाणपूल होईपर्यंत ग्रामस्थांनी करायचे तरी काय?
संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांच्या माध्यमातून बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला म्हणून श्रेयासाठी आटापिटा करणाऱ्या, पेपरबाजी करणाऱ्या राजकीय नेत्यांनी तेथील तात्पुरता पूल काढून टाकण्याच्या विषयावर मात्र मौनच धरल्याचे दिसून येते. मूळ वहिवाटीचा रस्ता बंद केला असताना तात्पुरता पूलही काढण्यात येणार असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कायमस्वरूपी उड्डाणपूल होईपर्यंत करायचे तरी काय, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
बोपखेलवासीयांना महामार्गावर दापोडीकडे येण्यासाठी पूर्वी वहिवाटीचा रस्ता होता, वर्षांनुवर्षे त्याचा वापर होत होता. मात्र, एका दाव्याचा निकाल देताना उच्च न्यायालयाने सुरक्षिततेच्या कारणास्तव हा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यावरून ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्यानंतरही बऱ्याच नाटय़मय घडामोडी झाल्या. अखेर, संरक्षणमंत्र्यांना लक्ष घालावे लागले. त्यांच्या मध्यस्थीने ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, लष्करी अधिकारी यांच्यात बैठका झाल्या, त्यातून बोपखेल-खडकी मार्गावर कायमस्वरुपी उड्डाणपूल करण्याचा निर्णय झाला. तोपर्यंत लष्कराने तात्पुरत्या स्वरूपात तेथे तरंगता पूल बांधला होता. मात्र, पावसाळा सुरू होणार असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सात जूनपासून हा पूल काढण्यात येणार असल्याचे लष्कराने स्पष्ट केले. याविषयीची पूर्वसूचना लष्कराने वेळोवेळी दिली होती. पूल काढण्यात आल्यानंतर पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले असले तरी उपलब्ध दोन्हीही पर्यायी मार्गाचा विचार करता ग्रामस्थांना खूप मोठा वळसा मारावा लागणार आहे, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नाराजी आहे. दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
दुसरीकडे, बोपखेलसंदर्भात यापूर्वी झालेल्या निर्णयांचा आधार घेत त्याचे राजकीय श्रेय घेण्यासाठी, वर्तमानपत्रांमध्ये बातम्या व फोटो छापून आणण्यासाठी चढाओढ होती. त्या राजकीय नेत्यांनी आता चुप्पी साधल्याचे दिसते आहे. महापालिकेच्या वतीने पूल उभारण्यात येणार असला तरी तो सुरू होऊन तो पूर्ण होण्यास भरपूर कालावधी जाणार आहे, तोपर्यंत नागरिकांनी करायचे काय, असा प्रश्न आहे. वर्षांनुवर्षे सुरू असलेला रहदारीचा रस्ता बंद करण्यात आला. त्याविरूध्द आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलीसांनी बेछूट लाठीमार केला, त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. तात्पुरता तरंगता पूल होता, आता तोही काढण्यात आला. नियोजित उड्डाणपुलाचे काय होणार, याविषयी ठोस माहिती नाही. अशा परिस्थितीत बोपखेल ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था असून आहे.

सात जूनपासून तरंगता पूल काढणार असल्याची पूर्वकल्पना लष्कराने दिली होती. कायमस्वरूपी पूल लवकरात लवकर पूर्ण होणे, हा त्यावरील उपाय आहे. तोपर्यंत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तोडगा काढणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असून संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार आहे.
– संजय काटे, नगरसेवक, बोपखेल.