वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषण नियंत्रणासाठी नियंत्रक बसविणे ही काळाजी गरज आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणांपासून वाचविण्यासाठी नियंत्रकांचा नागरिकांना फायदा होईल, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी येथे व्यक्त केले.

वाढत्या वाहनसंख्येमुळे शहराची प्रदूषण पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी अमोल चाफेकर यांनी हवा प्रदूषण नियंत्रक विकसित केले असून हे नियंत्रक शनिपार चौकाजवळील जनता सहकारी बँकेच्या परिसरात बसविण्यात आले. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

टिळक म्हणाल्या की, दुचाकी आणि सार्वजनिक वाहतुकीमधून प्रवास करणाऱ्या लोकांना प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रहदारीच्या ठिकणी नियंत्रक उभारण्याची आवश्यकता आहे. प्रदूषणातील वाढीचा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

या नियंत्रकामध्ये अशुद्ध हवा शोषून त्या हवेचे शुद्धीकरण केले जात असून शुद्ध हवा परत बाहेर सोडली जाणार आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. पुण्यात दोन हजार प्रदूषण नियंत्रके बसविण्यात येणार असून शहरातील पहिली यंत्रणा ही नळस्टॉप येथे कार्यरत आहे. शाळा, महाविद्यालये, आयटी पार्क, बँक, रुग्णालयांच्या परिसरात हे उपकरण बसविण्यात येणार आहे.