पुण्याच्या मराठमोळय़ा संस्कृतीचा गेल्या आठ दशकांचा मूक साक्षीदार आणि मराठी चित्रपटांचे माहेरघर हा नावलौकिक असलेल्या प्रभात चित्रपटगृहाने गुरुवारी तात्पुरती विश्रांती घेतली. या चित्रपटगृहाचा ताबा १० जानेवारी रोजी मूळ मालकाकडे जात असून, त्यानंतर पुन्हा या चित्रपटगृहाचा पडदा केव्हा उघडणार हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे गुरुवारी शेवटच्या दिवशी प्रभात चित्रपटगृहातील सर्व खेळ ‘हाऊसफुल्ल’ झाले.
इंदूर येथील संस्थानिक रामचंद्र किबे यांच्या मालकीचे हे चित्रपटगृह आहे. पत्नी लक्ष्मी यांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशातून त्यांनी ‘किबे लक्ष्मी थिएटर’ असे नामकरण केले होते. प्रभात फिल्म कंपनीच्या भागीदारांनी हे चित्रपटगृह चालविण्यासाठी घेतले आणि प्रभात फिल्म कंपनीवरून या चित्रपटगृहाचे प्रभात असे नामकरण करण्यात आले. या भागीदारांपैकी विष्णुपंत दामले यांचे नातू विवेक दामले यांच्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. कराराची मुदत संपल्याने हे चित्रपटगृह १० जानेवारी रोजी सरदार किबे यांचे नातू अजय किबे यांच्याकडे हस्तांतरित होणार आहे. चित्रपटगृह बंद केल्यानंतर पुढील कामांचा निपटारा करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने २५ डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली होती. त्यानुसार दिवसभरात चार चित्रपटांचे पाच खेळ झाल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री प्रभात चित्रपटगृहाचा पडदा पडला.
कितीही मल्टिप्लेक्स असली तरी प्रभात येथे येऊन मराठी चित्रपट पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे आम्ही आवर्जून प्रभात चित्रपटगृहाला भेट देतो, असे रमेश वैद्य यांनी सांगितले. प्रभात टॉकीज हा मराठी चित्रपटांचा केंद्रिबदू. हे बंद होऊ नये यासाठी आंदोलन करावे लागले तर त्यामध्ये मी अग्रभागी असेन, असे सांगून गुरुवार पेठ येथील गणेश मोझर म्हणाले, मित्रांचा वाढदिवस असो किंवा भिशी पार्टी आम्ही मराठी चित्रपट पाहूनच साजरा करतो. आता पुन्हा चित्रपटगृह केव्हा सुरू होईल हे माहीत नसल्याने शेवटच्या दिवशी आवर्जून उपस्थिती लावली आहे.
मीना आणि प्रकाश कुलकर्णी यांच्या जीवनातील सोनेरी क्षण प्रभात चित्रपटगृहातच जुळले. मी एसएनडीटी येथे बी.एड. करीत असताना हॉस्टेलला होते, तर प्रकाश शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. आम्ही चोरून चित्रपट पाहायला प्रभातमध्येच येत होतो, असे मीना कुलकर्णी यांनी सांगितले. मी वालचंदनगर येथील वर्धमान महाविद्यालयातून प्राध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाले असून, आम्ही कोथरूड येथे वास्तव्य करतो. अमेरिकेमध्ये इन्टेल कंपनीत काम करणारी सून ऋचा हीदेखील आमच्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी आली असल्याचे मीना कुलकर्णी यांनी सांगितले.

‘चित्रपटगृहासाठी सर्व सहकार्य करू’
२९ ऑगस्ट १९७१ रोजी मी प्रभात चित्रपटगृहामध्ये आलो. गेली ४३ वर्षे मी या चित्रपटगृहाच्या प्रवासातील साथीदार आहे. १० जानेवारीला एकदा ताबा दिला, की मी येथे असणार नाही. पण, किबे यांनी चित्रपटगृह सुरू ठेवले तर मराठी रसिकांसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रभात चित्रपटगृहाचे व्यवस्थापक बाळकृष्ण भिडे यांनी सांगितले.
अनंतराव दामले यांच्याशी परिचय असल्याने माझा प्रभात परिवारामध्ये समावेश झाला. मी आलो त्या वेळी सव्वा रुपया, पावणेदोन रुपये आणि अडीच रुपये असा तिकीट दर होता. १९८४ मध्ये नूतनीकरणासाठी चित्रपटगृह तीन महिने बंद ठेवले होते. प्रभातला ६० वर्षे झाली तेव्हा नाटकासाठी असलेला रंगमंच कमी करून चित्रपटगृहाचे पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. तेव्हा आसनक्षमता ७२२ वरून ८९४ करण्यात आली. प्रेक्षक हाच देव असे समजून मी रसिकांना सेवा दिली. यापूर्वी व्यवस्थापक म्हणून काम केलेल्या गणपतराव कुलकर्णी आणि बी. एस. राव या दोघांचे ‘ऑन डय़ूटी’ निधन झाले होते. मलाही तसाच मृत्यू यावा असे वाटत होते, पण नियतीच्या मनात काय आहे देव जाणे.. अशा शब्दांत भिडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.