भारतीय वृत्तपत्रांना विचारांची बैठक नसल्याने भारताशी बाजारपेठीय संबंध असणारे देश जे ठरवतात, त्यांचेच अंधानुकरण केले जाते. वृत्तपत्रांची मूल्ये संपलेली असल्याने त्यांच्या धोरणांत फरक दिसतो. बाजारपेठीय व्यवहारापेक्षा मूल्यांचा व्यवहार महत्त्वाचा आहे, हेच आपण विसरलो आहोत. आताची वर्तमानपत्रे राज्य, राष्ट्राची राहिलेली नसून ती स्थानिक झाली आहेत आणि हा स्थानिकपणा संकुचित होणारा आहे, अशी खंत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी व्यक्त केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव जयंती वर्षांच्या समारोपानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आणि सद्यस्थिती’ या विषयावर आयोजित परिसंवादात आंबेडकर बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. विजय खरे, लेखिका प्रतिमा परदेशी या वेळी उपस्थित होत्या.

आंबेडकर म्हणाले, डोनाल्ड ट्रम्पनी शपथ घेतली तेव्हा अमेरिकेतील अनेक शहरांत ट्रम्प अध्यक्षपदी नको म्हणून आंदोलने झाली. त्याला तेथील वृत्तपत्रांनी जागा दिली. तसेच वातावरण भारतातदेखील होते. परंतु नव्याने उदयाला आलेल्या मध्यम वर्गाकडून सैद्धांतिक संकल्पना जोपासल्या जात नसून त्या संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे नव्या व्यवस्थेत कसे उभे राहिले पाहिजे ते दिसत नाही.

मात्र, या व्यवस्थेविरुद्ध जे उभे राहतात त्यांना वृत्तपत्रांत स्थान मिळत नाही. त्यामुळे ते समाजमाध्यमातून व्यक्त होतात त्यांचे मूल्य सध्याच्या वृत्तपत्रांत स्तंभलेखन करणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. राज्यसंस्थेशी संबंधित नसलेल्या समूहाला सैद्धांतिक मांडणी असली पाहिजे, असे बाबासाहेबांनी त्यांच्या वृत्तपत्रांतून लिखाण केले. सध्या या समूहाला बातम्यांपलीकडे जागा दिसत नाही.

शैक्षणिक पातळीवर बाबासाहेबांच्या पत्रकारितेबाबत चर्चा होत नाही असे सांगून खरे म्हणाले, वृत्तपत्रांच्या जाहिरात घेण्यावर बाबासाहेबांनी कडाडून टीका केली होती.

जाहिरात आर्थिक साधन असले तरी नेहमी समाजहित केंद्रभूत असावे, असे ते म्हणत. दलितांच्या मूलभूत प्रश्नांवर वृत्तपत्रांतून चर्चा होत नसे आणि मंडईत म्हशीला रेडकू झाले तरी त्याची बातमी होत असे, या विरुद्ध मूकनायक, प्रबुद्ध भारत आणि जनता या वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखन केले.

स्त्रियांचे प्रश्न आणि जातीयता समाजात शिल्लक आहे तोवर बाबासाहेबांची पत्रकारिता कालबाह्य़ होणार नाही. ‘जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतर पत्रकारितेला व्यवसायाचे स्वरुप आले असून पत्रकारांनी स्वत:ला तत्त्वाची चौकट आखून घ्यायला हवी’, असे परदेशी यांनी सांगितले.