विधानसभेच्या जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीबरोबर चर्चा सुरू आहे; पण काँग्रेसचा सन्मान ठेवून जागावाटप झाले नाही, तर आघाडी होणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे झालेल्या विभागीय मेळाव्यात आक्रमक सूर लावला. आत्मसन्मान सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे काँग्रेस या वेळी तडजोड करणार नाही. त्यासाठी सर्व २८८ जागांवर लढण्याची तयारी सुरू करा, असेही आवाहन त्यांनी मेळाव्यात उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागांच्या वाटपाबाबत बुधवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीने १४४ जागांचा आग्रह कायम ठेवला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तेवढय़ा जागा न देण्याबाबत काँग्रेस ठाम आहे. पुण्यात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यातही मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुशीलुकमार शिंदे आदींनी अशाच आशयाची भाषणे केली. जागावाटपासंबंधीचा निर्णय घेताना काँग्रेसचा आत्ससन्मान महत्त्वाचा आहे. हा निर्णय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान जपणारा असला पाहिजे. काँग्रेसचा सन्मान राखला जाणार नसेल, तर आघाडी होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यात स्पष्टपणे सांगितले.
गेल्या विधानभा निवडणुकीत काँग्रेसच्या १० जागा वाढल्या आणि राष्ट्रवादीच्या १२ जागा कमी झाल्या. त्यामुळे आमची शक्ती वाढली आहे म्हणून आम्हाला जागा वाढवून द्या या राष्ट्रवादीच्या मागणीत काही तथ्य नाही. त्यांची शक्ती आमच्यामुळे वाढली आहे. हे राष्ट्रवादीबरोबरच्या बैठकीतही आम्ही स्पष्ट केले, असे सांगून माणिकराव ठाकरे म्हणाले, की त्यांची १४४ जागांची मागणी आम्ही कदापि मान्य करणार नाही. त्यासाठीच १४४ ऐवजी २८८ जागांची तयारी आपल्याला करायची आहे. तेवढय़ा जागा लढण्यासाठी आपण सिद्ध असले पाहिजे.
जनतेसाठीच्या योजनांचे निर्णय सरकारला आता झटपट घ्यावे लागतील. तरच विजय मिळेल. लोकसभेत झटका सगळ्यांनाच बसला आहे. आघाडी की स्वबळावर हे गेल्यावेळीच सांगितले होते. त्यामुळे आता काही निर्णय हायकमांडवर सोडून चालणार नाहीत. काही गोष्टींचे निर्णय आपल्यालाच घ्यावे लागतील, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. आघाडीचे काही होईल न होईल; पण आपण सर्व जण प्रामाणिकपणे कामाला लागलो नाही, तर मग कठीण होईल. त्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा तो १ ते ५ ऑगस्ट दरम्यानच घ्या, अशीही सूचना त्यांनी केली.
काँग्रेस उमेदवारांची यादी ७ ऑगस्टपर्यंत
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ज्या जागा लढणार आहे त्या उमेदवारांची पहिली यादी ५ ते ७ ऑगस्टपर्यंत जाहीर केली जाईल. तसेच दुसरी यादी लगेचच म्हणजे दोन-तीन दिवसात जाहीर केली जाईल. राष्ट्रवादीची १४४ जागांची मागणी कदापि मान्य केली जाणार नाही.
माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस