राज्य सरकारने तीन महिन्यांपूर्वी थेट निवडणूक कायदा केला. थेट निवडणूक ही हुकूमशाहीकडे वाटचाल असून संविधानावर आघात करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक तप-सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत धानोरी येथे शिवशंभो ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी होते. आमदार शरद रणपिसे, उपमहापौर मुकारी अलगुडे यांच्यासह शहर काँग्रेसचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, काँग्रेसच्या काळात बँकांचे राष्ट्रीयीकरण करून जनतेची सत्ता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भाजप सरकारचे मात्र खासगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काळा पैसा हा परदेशातील बँकांमध्ये लपविला जातो. सोने, घरे आणि बोगस कंपन्यांच्या माध्यमातून हा पैसा गुंतविण्यात आला आहे. मात्र त्यावर छापे टाकण्यात आलेले नाहीत. नोटाबंदीमुळे अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सरकारने त्वरित दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करून दोनशे रुपयांच्या नोटा चलनात आणाव्यात. नोटाबंदी आणि दोन हजार रुपयांच्या नोटा छपाईचा निर्णय केवळ राजकीय असून पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.