माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अशास्त्रीय पद्धतीने पाणीसाठे खोदले जात असून अनेक बंधारे गळके आहेत. बंधाऱ्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना सरकारी अधिकाऱ्यांनी व्यवस्थित कामे करण्याच्या नावाखाली अभय देऊन चांगले अहवाल दिले आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना ठेकेदारधार्जिणी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केला. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे ऐकण्यात येते. परंतु, योजनेबाबत सरकार दरबारी सर्व आलबेल आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

पद्मभूषण बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार वितरण सभारंभात चव्हाण बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब भारदे प्रतिष्ठानचे अजय भारदे या वेळी उपस्थित होते. मृदशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. मन्ना, जलसंधारण क्षेत्रात काम करणारे विजय बोराडे आणि कीर्तनकार रामदार महाराज जाधव यांना बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

चव्हाण म्हणाले, सिंचन आणि जलसंधारणात आपण चुकलो आहोत. आजवर झालेली चुकीची कामे पाहण्यासाठी आणि त्या चुका सुधारण्यासाठी श्वेतपत्रिका काढली. परंतु, सरकारमधील सहकारी पक्षाला संपवण्यासाठी श्वेतपत्रिका काढल्याचा गवगवा झाला. राज्यात सध्या सव्वा लाख कोटी रुपयांची धरणांची कामे प्रलंबित आहेत.

बोराडे म्हणाले, जलयुक्त शिवार योजना ही पाणलोट क्षेत्र आणि मृदसंधारणावर आधारित नसून केवळ एक उपक्रम आहे. मृद आणि पाणी यांचा परस्परसंबंध असून त्यांचा योग्य समतोल राखायला हवा. शेतकऱ्यांना हक्काचे पाणी द्यायचे असल्यास पाणलोट क्षेत्र विकास करायला हवा.

‘भारतात दैनंदिन ६५ मिलियन कचरा साठतो. त्यातील केवळ १५ टक्के कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार होते. बाकी कचऱ्यापासून दरुगधी, घाण होऊन आजार वाढतात. त्यामुळे जास्तीत जास्त कचऱ्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे’, असे मन्ना यांनी सांगितले.

‘काश्मिरात सरकारी नावाची यंत्रणाच शिल्लक नाही’

केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केलेल्या कामांचे विश्लेषण करण्यासाठी श्रीनगर येथे गेलो होतो. तेथे शाळकरी विद्यार्थीही दगडफेकीत सामील होत आहेत. तेथे सरकार नावाची यंत्रणाच शिल्लक राहिलेली नाही. काही वर्षांपूर्वी श्रीनगरचा प्रभारी म्हणून पक्षाने जबाबदारी दिली होती. त्यानिमित्ताने तेथे जाणे व्हायचे, तेव्हा आजच्या एवढी विदारक परिस्थिती नव्हती. आजची श्रीनगरची परिस्थिती पाहून वाईट वाटले, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.