राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या दोन वर्षांच्या शुल्काची निश्चिती शुल्क नियमन प्राधिकरणाने केली असून, या प्राधिकरणाने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पाचशेहून अधिक महाविद्यालयांच्या चालू वर्षांच्या आणि पुढील वर्षांच्या शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे, वाढीव खर्च दाखवून विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क उकळणाऱ्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना शुल्क परत करावे लागणार आहे. राज्यातील पंधरा महाविद्यालयांचे शुल्क पन्नास टक्क्यांपेक्षा कमी करण्यात आले आहे.

वैद्यकीय, वैद्यकीय पूरक सेवा अभ्यासक्रम (पॅरामेडिकल), परिचर्या सेवा अभ्यासक्रम, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, विधी या अभ्यासक्रमांचे शुल्क प्राधिकरणाने निश्चित केले आहे. प्राधिकरणाकडे शुल्कवाढीसाठी आलेल्या अर्जाची छाननी करून शुल्काची निश्चिती करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून आतापर्यंत पाचशेहून अधिक महाविद्यालयांच्या शुल्कात कपात करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये परिचर्या अभ्यासक्रम आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रमाण अधिक आहे.

प्राधिकरणाने पुढील वर्षांसाठीचे (२०१७-१८) आणि चालू वर्षांसाठीचे (२०१६-१७) शुल्क निश्चित केले आहे. महाविद्यालयांचा गेल्या वर्षीचा (२०१५-१६) आर्थिक ताळेबंद आणि या वर्षी त्यांनी दाखवलेला खर्च लक्षात घेऊन शुल्क ठरवण्यात आले आहे. पुढील वर्षांसाठीचे शुल्क निश्चित करून त्यापेक्षा चालू वर्षांचे शुल्क दहा टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. त्या हिशेबात, यंदा विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले अतिरिक्त शुल्क त्यांना परत करावे लागणार आहे. याबाबत महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे प्राधिकरणातील एका सदस्यांनी सांगितले. महाविद्यालयांसाठी मान्य झालेल्या शुल्काचा तपशील प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार विद्यार्थी महाविद्यालयाकडे शुल्काबाबत विचारणा करू शकतील.

राज्यातील पंधरा महाविद्यालयांच्या शुल्कात पन्नास टक्क्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. ती महाविद्यालये व तेथील शुल्ककपात टक्क्यांमध्ये पुढीलप्रमाणे..

सातारा येथील छाबडा महाविद्यालयाचा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम – ६६.८५ टक्के, पुण्यातील रायसोनी महाविद्यालयाचा व्यवस्थापन अभ्यासक्रम – ६३.२१, हिंगोली येथील गीताई चॅरिटेबल ट्रस्टचे अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय – ६२.८९ टक्के, आणि पदविका अभ्यासक्रम – ५८.२८ टक्के, परभणी येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापन अभ्यासक्रम – ६२.१६ टक्के, मुंबई येथील विद्यालंकार इन्स्टिटय़ूटचे अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम – ५९.१३ टक्के, मीरा रोड येथील तिवारी महाविद्यालयाचा व्यवस्थापन अभ्यासक्रम – ५७.८० टक्के, कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम – ५५.८४ टक्के, सोलापूर येथील ब्रह्मदेवदादा माने महाविद्यालय पदव्युत्तर पदवी – ५५.०४ टक्के, पुण्यातील भारती विद्यापीठाची जवाहरलाल नेहरू इन्स्टिटय़ूट अभियांत्रिकी पदविका  – ५२.९० टक्के, परभणी येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ पदव्युतर पदवी – ५२.२९ टक्के, बुलढाणा येथील आनंद शिक्षण प्रसारक मंडळाचे आयुर्वेद महाविद्यालय – ५१.५६ टक्के, रत्नागिरी येथील राजेंद्र माने इन्स्टिटय़ूट व्यवस्थापन अभ्यासक्रम – ५१.४३ टक्के, चंद्रपूर येथील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमय्या महाविद्यालय अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम – ५० टक्के.

शुल्क कमी का झाले?

  • महाविद्यालयांमध्ये मान्यताप्राप्त शिक्षक नसतानाही शिक्षकांच्या पगारापोटी शुल्क दाखवण्यात आले होते.
  • साहित्याचे शुल्क वेगळे दाखवूनही विद्यार्थ्यांकडून ओळखपत्र, ग्रंथालय, उपक्रम यांचे शुल्क वेगळे दाखवण्यात आले होते.
  • शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे कर, निवृत्तिवेतन याची तपशील संस्था दाखवू शकली नाही.
  • शिक्षकांच्या बँक खात्यात वेतन जमा न करता ते रोखीत देण्यात आले. असे वेतन गृहित धरण्यात आले नाही.
  • विद्यार्थी संख्या कमी दाखवण्यात आली होती.
  • याशिवाय २४ महाविद्यालयांचे शुल्क हे ४० ते ५० टक्क्यांदरम्यान कमी, ४० महाविद्यालयांचे शुल्क ३० ते ४० टक्क्यांपर्यंत, ७७ महाविद्यालयांचे शुल्क २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.

 

शुल्क कसे निश्चित झाले?

  • महाविद्यालयाला येणार खर्च भागिले विद्यार्थ्यांची संख्या अशा गणिताने शुल्कनिश्चिती करण्यात आली. त्याचबरोबर महाविद्यालयाने खर्चाचे जे मुद्दे नमूद केले होते तो खर्च प्रत्यक्षात होतो का याची पडताळणी करण्यात आली.
  • सध्या शुल्क नियमन प्राधिकरणाकडून महाविद्यालयांची पाहणी करण्यात येत आहे. येत्या काळातही ही पाहणी होणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.

 

संकेतस्थळावर माहिती

शुल्क नियमन प्राधिकरणाच्या sspnsamiti.gov.in  या संकेतस्थळावर शुल्काचा तपशील आहे. विद्यार्थी शुल्काबाबत प्राधिकरणाकडे तक्रार करू शकतील.