विज्ञान आणि इंग्रजी विषयांचाही समावेश; ७५ टक्के गुण मिळवणारे ‘प्रगत’

गेले तीन वर्षे राज्यात गाजणाऱ्या ‘नैदानिक चाचण्यां’ऐवजी प्रगती चाचण्या घेण्यात येणार असून या चाचण्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी ‘प्रगत’ झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. गुण वाटपात गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यात भाषा आणि गणित या विषयांबरोबर विज्ञान आणि इंग्रजी या विषयांसाठीही चाचण्या घेण्यात येतील.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या क्षमतांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नैदानिक चाचणी’ सुरू केली. आता या चाचण्यांच्या स्वरूपात थोडासा बदल करून त्याला ‘प्रगती चाचणी’ अशी नवी ओळख देण्यात आली आहे. यापूर्वी चाचण्यांमध्ये शंभर टक्के मिळवणारे विद्यार्थी प्रगत समजण्यात येत होते. आता प्रगती चाचण्यांमध्ये ७५ टक्के किंवा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी ‘प्रगत’ म्हणून गणले जातील. असे ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असलेला वर्ग ‘प्रगत’ म्हणून ओळखण्यात येईल. मात्र आपला वर्ग प्रगत दाखवण्यासाठी गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईही होणार आहे.

चाचणीनंतर एका महिन्याच्या आत केंद्रप्रमुखांकडून त्यांच्या अखत्यारितील सर्व शाळा आणि त्यातील सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांनी केलेल्या मूल्यमापनात जर २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त फरक आढळला तर शिक्षकांना नोटीस देण्यात येणार आहे.

चाचण्यांचे स्वरूप काय?

यामध्ये पूर्वीप्रमाणेच वर्षभरात तीन चाचण्या घेण्यात येतील. प्रगती चाचण्या पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित, तिसरी ते पाचवीसाठी भाषा, गणित व इंग्रजी आणि सहावी ते आठवीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांच्या घेण्यात येतील. गैरहजर विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात येतील. अप्रगत विद्यार्थ्यांची दर महिन्याला चाचणी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘नैदानिक चाचण्यां’तर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरले जात असले तरीही ते सर्वत्र जाहीर केले जात नव्हते. मात्र आता प्रत्येक पातळीवर विद्यार्थ्यांला मिळालेले गुण हे जाहीर केले जातील.