ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कचऱ्यापासून खत तयार करणारे तीन प्रकल्प शहराच्या मध्य वस्तीत सुरू होत असून या प्रकल्पांचे उद्घाटन शनिवारी (४ जुलै) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते केले जाणार आहे.
शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी विविध प्रभागांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे प्रकल्प उभारण्याची योजना असून दैनंदिन पाच टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे तीन प्रकल्प नव्याने बसवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक ५८, ५० आणि ३७  येथे हे प्रकल्प सुरू होत असून या प्रकल्पात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार केले जाणार आहे. प्रभाग ५८ चे नगरसेवक अशोक येनपुरे, प्रतिभा ढमाले, प्रभाग ५० चे नगरसेवक दिलीप काळोखे आणि प्रभाग ३७ चे नगरसेवक हेमंत रासने व मुक्ता टिळक यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या प्रभागांमध्ये नागरिकांकडून कचरा घेताना तो ओला व सुका या पद्धतीने वर्गीकरण करून घेतला जातो. त्यातील ओल्या कचऱ्यावर आता प्रक्रिया केली जाणार असून प्रत्येक प्रभागात जी यंत्रणा बसवण्यात आली आहे त्यासाठी प्रत्येकी ७० लाख रुपये खर्च आला आहे.
इकोमॅन एन्व्हायरो सोल्युशन्स या कंपनीने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे हे यंत्र तयार केले असून घरगुती वापराची यंत्रेही कंपनीने तयार केली आहेत. या यंत्रात चोवीस तासात खताची निर्मिती होते. अडीच हजार चौरसफूट जागेत हा प्रकल्प सुरू होऊ शकतो. यंत्रात तयार होणाऱ्या खताचा वापर उद्यानांमध्ये करता येणार आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारे हे यंत्र पूर्णत: स्वयंचलित असल्याचे सांगण्यात आले.