‘‘कर्करोग म्हणजे आयुष्याचा शेवट,’ हा समज बदलणे फार महत्त्वाचे आहे. ‘अब इन्हे दवा की नही; दुवा की जरूरत हैं,’ असे संवाद आम्हाला चित्रपटात म्हणावे लागतात. पण कर्करोगाच्या केवळ नकारात्मक आकडेवारीकडेच लक्ष न वेधता कर्करोगातून बऱ्या झालेल्यांच्या प्रेरक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात. कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठीचा प्रयत्न कितीही लहानसा असो; त्यामुळे फरक नक्की पडतो,’’ असे मत प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिने व्यक्त केले.
‘प्रशांती कॅन्सर केअर मिशन’ आणि ‘ऑर्किड्स ब्रेस्ट हेल्थ’ या संस्थांतर्फे महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘नो युवर ब्रेस्ट अँड बियाँड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी काजोल गुरुवारी पुण्यात आली होती. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी, पाश्र्वसंगीतकार रसुल पोकुट्टी, ‘प्रशांती’ संस्थेचे डॉ. आनंद कोप्पीकर या वेळी उपस्थित होते.
‘मला पुण्यात यायला खूप आवडते. आमचे काही नातेवाईक पुण्यात असल्यामुळे आजीबरोबर आम्ही पुण्याला येत असू,’ अशा आठवणी काजोलने सांगितल्या. कर्करोगाविषयीच्या जनजागृतीबद्दल ती म्हणाली, ‘‘कर्करोगाशी झुंज देऊन बरे झालेले अनेक जण स्वत:ला ‘कॅन्सर सव्र्हायव्हर’ म्हणवून हिमतीने कार्यरत राहतात. हे चित्र पाहून बरे वाटते. आपण नेहमी कर्करोगाने किती बळी घेतले अशा नकारात्मक आकडेवारीविषयी बोलत राहतो. त्याऐवजी त्यातून बरे झालेल्यांच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात.’’
आपल्या आईला व मोठय़ा बहिणीला कर्करोग झाल्याकारणाने आपणही जवळून तो अनुभवला, असे तनुजा यांनी सांगितले. नवाझुद्दिन सिद्दिकी यानेही आपल्या बहिणीला कर्करोग झाल्यानंतरच आपला ‘प्रशांती’ संस्थेशी संपर्क आल्याचे सांगितले.