नियोजनशून्य जनसंपर्क

‘श्रीमंत’ महापालिकेचा माहिती आणि जनसंपर्क विभाग हा कसा तकलादू आहे, याचा अनुभव या विभागाशी संबंधित मंडळी गेल्या अनेक वर्षांपासून घेत आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग हे कायमचे दुखणे असून ‘प्रसिद्धी’ या विषयाचे फारसे आकलन नसलेली मंडळी येथे कार्यरत आहेत. प्रसिद्धिपत्रके (प्रेस नोट) कशी नसावी, याचे उत्तम उदाहरण येथे मिळते. वेगवेगळ्या विभागांचा समन्वय नसल्याने प्रत्येकाची स्वतंत्र प्रसिद्धिपत्रके काढली जातात, त्यातून झाला तर गोंधळच निर्माण होतो. अधिकारी केवळ मिरवण्यापुरते असून कर्मचाऱ्यांना कोणी वाली नाही. संबंध नसलेली कामे करणे, नगरसेवक-अधिकाऱ्यांचा शिव्या खाणे हेच या विभागाचे मुख्य काम बनले आहे.

िपपरी पालिकेचे ‘नाव मोठे लक्षण खोटे’, हे अनेक बाबतीत दिसून येते, त्याचाच एक भाग म्हणून जनसंपर्क विभागाकडे पाहिले जाते. नावात ‘जनसंपर्क’ असले, तरी अपेक्षित असा कोणाशीच संपर्क नसलेल्या या विभागाचे सुरुवातीला ‘जनसंपर्क व स्वागत कक्ष’ असे नाव होते. आता ‘माहिती व जनसंपर्क विभाग’ असे नामकरण झाले आहे. आधीही कामगिरी सुमार होती, नंतरही फरक पडलेला नाही. महापालिकेच्या भव्य इमारतीत प्रवेश केल्यानंतर जाणवते, की स्वागत कक्ष नावाचा प्रकारच नाही. ‘मे आय हेल्प यू’ किंवा ‘आपणास काही माहिती हवी आहे का’ असा काही फलक किंवा तशी काही यंत्रणा नाही. नवीन माणूस मुख्यालयात आल्यास तो इकडे-तिकडे फिरत राहतो, दिसेल त्याला विचारत राहतो. अपेक्षित माहिती त्याला मिळत नाही, हेच िपपरी पालिकेचे ‘फर्स्ट इम्प्रेशन’ ठरते.

जनतासंपर्क विभागाचे महत्त्व आणि उपयुक्तता कधी, कोणी लक्षातच घेतली नाही. सर्वाना नको वाटणारी जागा जनसंपर्कच्या वाटणीला आली आहे. अडचणीच्या जागेत एका अरुंद बोळीत या विभागाचा कारभार चालतो. पुरेसे कर्मचारी नाहीत, अपेक्षित सोयीसुविधा, साहित्य त्यांना मिळत नाही. त्याचा कामावर परिणाम होतो. प्रसिद्धीसारखा महत्त्वाचा विषय सांभाळणाऱ्या या विभागात असंबंधित माणसांचा भरणा आहे. आवश्यक गोष्टींची उपलब्धता येथे नाही. कुशल कर्मचारी वर्ग नाही. अद्ययावत सुविधांचा वापर केला जात नाही. महापालिकेची प्रतिमा चांगली ठेवायची असल्यास तशी सकारात्मक प्रसिद्धी मिळवून देणारा विभाग सक्षम असला पाहिजे. मात्र, पालिकेचे प्रसिद्धिपत्रक तयार करणाऱ्यांना अशा कामाचा कोणताही अनुभव नाही. पत्रकारितेचा त्यांचा दूपर्यंत संबंध नाही. त्यामुळेच प्रसिद्धिपत्रकांचा दर्जा टुकार असतो. गेल्या काही वर्षांतील कोणतेही प्रसिद्धिपत्रक पाहिल्यास त्याची साक्ष पटू शकते. बातमीसाठी आवश्यक मसुदा त्यामध्ये कधीच नसतो. केवळ नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या नावांचा भरणा असतो. अनेकदा नसलेल्या मंडळींची नावे असतात आणि जे हजर असतात, त्यांची नावे गाळली जातात, असे प्रकार अनेकदा दिसून आले आहेत. पालिकेचे सातत्याने कार्यक्रम होत असतात. कार्यक्रम झाल्यानंतर प्रसिद्धिपत्रकासाठी ‘दीर्घ प्रतीक्षा’ ठरलेली असते. छायाचित्रे तत्काळ उपलब्ध होतात, बातमीपत्राचा उशिरा रात्रीपर्यंत तपास नसतो. स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, शिक्षण मंडळ, मिळकत कर, उद्यान, वैद्यकीय, कला-क्रीडा-सांस्कृतिक विभाग अशा वेगवेगळ्या विभागांच्या स्वतंत्र प्रसिद्धी यंत्रणा आहेत, त्यांच्यात समन्वय नावाचा प्रकार नाही. बातमीसाठी जे आवश्यक मुद्दे असतात, ते सोडून सर्व काही यामध्ये असते. ठरावीक पद्धतीने प्रसिद्धिपत्रके वर्षांनुवर्षे दिली जातात, त्यात कालानुरूप बदल आवश्यक असूनही तो होत नाही. स्थायी समितीच्या बैठकांची माहिती बहुदा अपुरी व चुकीचीच दिली जाते. एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन असल्यास, त्याची कार्यक्रमापूर्वी सविस्तर माहिती कधीही उपलब्ध करून दिली जात नाही. पाणी बंदचे निवेदन अभावानेच वेळेत उपलब्ध होते. कार्यक्रम पत्रिका, निमंत्रणपत्रिका वेळेवर दिल्या जात नाही. कारण, पत्रिका ही वेळेवर देण्यासाठी नसतेच, असा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता आहे. अगदी कालपरवा चिंचवडला केएसबी चौकातील ग्रेडसेपरेटचे उद्घाटन झाले, तेव्हाही तेच झाले. कार्यक्रमाच्या दिवशी (अगदी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही काळ) पत्रिका वाटण्याचे काम सुरू असते. ऐन वेळी पत्रिका मिळाल्याने कोणालाही नियोजन करता येत नाही. नगरसेवक व अधिकाऱ्यांना वाटण्यात आलेल्या पत्रिका तशाच पडलेल्या दिसून येतात. बहुतांश वेळा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पत्रिका मिळतच नाही. हे कमी म्हणून काय, पत्रिकांमधील ‘मानापमान नाटय़’ व त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची होणारी फरफट ठरलेली आहे. कोणाचे नाव टाकायचे अन् कोणाचे गाळायचे, वरच्या भागात कोणाला स्थान द्यायचे आणि खाली कोणाला ठेवायचे, हे वादाचे मुद्दे अनेक वर्षे दिसून येतात. काही संबंध नसताना यावरून कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना बोलणी खावी लागतात, ते आता त्यांच्याही पूर्णपणे अंगवळणी पडले आहे. ऐन वेळी कार्यक्रम ठरण्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत पत्रिकेत बदल होणे, नवीन राहिले नाही. पत्रिकेत नावे असणाऱ्यांनाच कार्यक्रमाची माहिती नसते. पूर्वी, प्रत्येक पत्रिकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव टाकण्याचा दंडक होता. पवार अभावानेच यायचे. आता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाशिवाय पत्रिका पूर्ण होत नाही. त्यांना माहिती असते की नाही, असा प्रश्न पडू शकतो. कारण, ते कार्यक्रमांना येत नाहीत. मुळातच संबंध नाही, अशी अनेक कामे जनसंपर्कच्या माथी मारली जातात. बैठकीसाठी चहापानाची, नास्त्याची व्यवस्था करणे, त्याचे वाटप करणे, सन्मानचिन्ह तयार करणे, अशी बरीच कामे आहेत, ज्यातच कर्मचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला येतो. मूळ काम बाजूला राहते. कार्यक्रमांचे निवेदन करण्याची कामगिरी याच विभागातील कर्मचारी रेटून पार पाडतात. त्यांची निवेदनशैली हा अनेकदा मनोरंजनाच्या कार्यक्रमाची आठवण करून देते.

प्रशासन विभाग सांभाळणाऱ्या महेश डोईफोडे यांच्याकडेच जनसंपर्क विभागाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांचे या विभागाकडे बिलकूल लक्ष नाही. त्यांच्याकडे हा विभाग आहे, हेच मुळी कोणाला माहिती नाही. आतापर्यंतचा त्यांचा प्रशासकीय प्रवास पाहता या विभागाशी काही घेणं-देणं नसल्यासारखे त्यांचे वागणे आहे. त्यांना या विभागाच्या समस्याही माहिती नसाव्यात. त्यामुळे त्या सोडवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महापालिकेच्या कार्यक्रमांचे नियोजन त्यांच्याच अखत्यारित असलेल्या विभागाकडून होत असताना डोईफोडे पालिकेच्या कार्यक्रमांना हजर राहत नाहीत. ‘साहेबा’चे लक्ष नसल्याने जे व्हायचे तेच या विभागाचे झाले आहे. अण्णा बोदडे हे या विभागाचे प्रशासन अधिकारी आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे निकटवर्तीय असा शिक्का असलेले बोदडे अधिकारी कमी व राजकारणी जास्त वाटतात. अलीकडेच त्यांना सहायक आयुक्तपदाची (प्रभारी) बढती मिळालेली आहे. त्यांना जनसंपर्कच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. मात्र, प्रत्यक्ष विभाग चालवताना तो दिसून येत नाही. आतापर्यंत हे असेच चालत आले आहे. राजीव जाधव आयुक्त असताना येथील समस्यांसाठी त्यांनी स्वतंत्र बैठक घेतली, तेव्हा भरपूर चर्चा झाली. अपेक्षित फलनिष्पत्ती झाली नाही. आता नवे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लक्ष घालावे लागणार असून नियोजनशून्य ‘जनसंपर्क’ विभागाला ‘उपयुक्त’ करण्यासाठी योग्य कार्यवाही करावी लागणार आहे.