‘पूर्वी तरूण चळवळींनी भारलेले होते, नंतर त्या थंडावल्या. आयुष्यात साहस हवेच, नाहीतर आयुष्य मिळमिळीत होते,’ असे मनोगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.  
‘साधना’ साप्ताहिकातर्फे ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेल्या ‘युगांतर- मन्वंतराचा उत्तरार्ध’ या पुस्तकाचे डॉ. आमटे यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. डॉ. मंदा आमटे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, महाराष्ट्र फाउंडेशनचे सुनील देशमुख या वेळी उपस्थित होते.
डॉ. आमटे म्हणाले, ‘‘एकेकाळी चळवळी जोरात होत्या, तरूण भारलेले होते. पण नंतर त्या थंडावल्या. आयुष्यात साहस गरजेचे आहे, नाहीतर आयुष्य मिळमिळीत होते. बाबांना खूप काही करायचे होते, म्हणूनच ते आयुष्यभर अस्वस्थ राहिले. त्यांनी संस्था म्हणून नव्हे तर कुटुंब म्हणून काम केले. आता भारत महासत्ता होतो आहे असे म्हणतानाही विषमता कायम आहे. ४० टक्के आदिवासी दारिद्रयरेषेखाली आहेत. त्यांचा विचार आपण करायलाच हवा.’’

हे तर बुरे दिन!
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘केंद्र आणि राज्यातील बदललेली सत्ता आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाचशे दिवस उलटून जाऊनही या घटनेचा न लागलेला तपास या पाश्र्वभूमीवर ‘बुरे दिन’ आल्यासारखे वाटते आहे.’’