मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरील धामणे गावात मंगळवारी पहाटे दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबातील तीन जणांची हत्या केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. टिकावाचे वार करून निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील सोमाटणे फाट्याजवळ धामणे गावात नथू विठोबा फाले आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. सोमवारी रात्री दरोडेखोरांनी गावात दरोडा घातला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नथू विठोबा फाले, छबाबाई विठोबा फाले आणि मुलगा आक्रिनंदन उर्फ आबा विठोबा फाले अशी या मृतांची नावे आहेत.  या हल्ल्यात नथू फाले यांची सून आणि नातू जखमी झाले आहे. दरोड्याचे वृत्त समजताच तळेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले.  डोक्यात टिकावाचे घाव घालून तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने गावात भीतीचे वातावरण आहे.

दरोड्यामध्ये लुटून नेण्यात आलेल्या मालाचा पंचनामा सुरु आहे. तळेगाव पोलीस ठाण्यात दरोडा व खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.