पुण्यातील लोहगाव परिसरात मंगळवारी ३० वर्षाच्या तरुणाने रागाच्या भरात आठ वर्षाच्या सावत्र भावाची हत्या केल्याची घटना घडली. विमानतळ पोलिसांनी ज्ञानेश्‍वर वरळे याला अटक केली आहे.

एअरफोर्स ऑफिसर मॅरीड क्वार्टरमध्ये राहणाऱ्या पांडुरंग वरळे यांचा दहा वर्षापुर्वी दुसरा विवाह झाला होता. त्यांना पहिल्या पत्नीपासून ज्ञानेश्‍वर वरळे तर दुसऱ्या पत्नीपासून रघुनाथ वरळे (वय ८) अशी दोन मुले होती. मंगळवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ज्ञानेश्‍वर याने रागाच्या भरात रघुनाथवर तीक्ष्ण हत्याराने वार केला. आवाज ऐकून बाजूच्या खोलीतून पांडुरंग वरळे पळत आले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रघुनाथला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले. विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटकही केली. सुरुवातीला याप्रकरणात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. संध्याकाळी ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना रघुनाथचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी ज्ञानेश्‍वरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे समजते. मात्र त्यांच्यात काय वाद झाला, ज्ञानेश्वर का चिडला हे मात्र समजू शकलेले नाही. ज्ञानेश्वरच्या चौकशीनंतर हत्येचे नेमके कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले.