मुलगा नसल्याच्या रागातून काकूनेच आपल्या पाच वर्षीय पुतण्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात गुरूवारी दुपारच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी काकू अनिता खांडेकर हिला २४ तासांच्या आत अटक केली. अनिता हिने मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव रचला होता. पण पोलीस तपासात अनिता हिनेच खून केल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. माऊली विनोद खांडेकर (वय ५,रा. ससाणे नगर, हडपसर) असे मृत मुलाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, आपल्याला मुलीच आहेत, मुलगा नाही, मात्र शेजारी राहणाऱ्या धाकट्या जावेला मुलगा आहे. या कारणामुळे सतत हिणवले जात. याच रागातून अनिता हिने आपला सख्ख्या पुतण्या माऊलीचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर घराजवळील पाण्याच्या ड्रममध्ये तिने मृतदेह लपवून ठेवला होता.

गुरूवारी सकाळच्या सुमारास माऊली हा बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर खांडेकर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी बराच वेळ माऊलीचा शोध घेतला पण तो सापडला नाही. अखेर हडपसर पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तेव्हा अनिता यांनीच माऊलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली. काही काळ घरामध्येच पलंगाखाली तिने माऊलीचा मृतदेह लपवून ठेवला होता. मात्र घरातील मंडळी आणि पोलीस मुलाच्या शोधात घराबाहेर पडल्याची संधी साधून घरामागील पाण्याच्या ड्रममध्ये तिने मृतदेह टाकला.