चेन्नई येथून पोर्ट ब्लेअरला जाताना बंगालच्या उपसागरावरून बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानात फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे या तरुण हवाई दल अधिकाऱ्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. कुणाल हे निगडी येथे राहणारे आहेत.
२८ वर्षीय कुणाल बारपट्टे हे एएन-३२ विमानात नेव्हिगेटर म्हणून कार्यरत होते. निगडी प्राधिकरणातील सिंधुनगर एलआयजी कॉलनीमधील ते रहिवासी आहेत. राजेंद्र आणि विद्या बारपट्टे यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत. दरम्यान, बेपत्ता विमानाचा अद्याप शोध न लागल्याने कुणाल यांच्या वडिलांनी  नाराजी दर्शविली आहे. राजेंद्र हे सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट येथील निवृत्त वैज्ञानिक आहेत. त्यांनी हवाई दलातर्फे देण्यात येणा-या विमानांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उभे केल्याचे पुणे मिरर या इंग्रजी वृत्तपत्रात म्हटले आहे. या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हवाई दलाचे विमान बेपत्ता झाल्याचे वृत्त कळले तेव्हा लगेचचं राजेंद्र यांनी कुणालला फोन लावून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, समोरून त्यांना काहीच उत्तर न मिळाल्याने त्यांनी कुणालच्या सहका-यांना आणि वरिष्ठ अधिका-यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथूनही त्यांना काहीच माहिती मिळाली नाही, असे कुणालची आई विद्या यांनी सांगितले.
एएन-३२ विमानाने शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता तांबरम हवाई तळावरून उड्डाण केले होते व त्यानंतर सोळा मिनिटांतच त्याचा संपर्क तुटला होता. हे विमान पुन्हा इंधन न भरता चार तास चालू शकते.  हवाई दल, नौदल, तटरक्षक दल यांनी शोधकार्य चालवले असून त्यात एक पाणबुडी, आठ विमाने व १३ जहाजे यांचा समावेश आहे. बेपत्ता विमानात सहा कर्मचारी होते त्यात दोन वैमानिक व एका दिशादर्शक व्यक्तीचा समावेश होता. भारतीय हवाई दलाचे ११, लष्कराचे २ तर तटरक्षक दलाचा १ आणि नौदलाचे ९ जण त्या विमानात आहेत. शोधकार्यावर देखरेख करण्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर चेन्नईतील तांबरम हवाई तळावर पोहोचले आहेत.