बॉम्बशोधक पथकातून ‘आझाद’ या श्वानाला निवृत्ती देण्यात आल्यानंतर आता त्याच्या जागी नवीन श्वानाची भरती करण्यात आली आहे. नवीन श्वानाचे नामकरण ‘विराट’ असे करण्यात आले असून त्याला स्फोटके हुडकून काढण्याचे खडतर प्रशिक्षण देण्यास सुरूवात झाली आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

बॉम्बशोधक नाशक पथकातील (बीडीडीएस) श्वानांवर पडणारा ताण विचारात घेऊन त्यांच्या निवृत्तीचे वय निश्चित करण्यात आले आहे. बॉम्बशोधक पथकात आठ वर्ष पूर्ण केलेल्या श्वानांचा वापर करण्यात येऊ नये, असे आदेश काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. श्वानांचे कामाचे वय निश्चित करण्यात आल्यानंतर बॉम्बशोधक पथकातील ‘आझाद’ या श्वानाला जानेवारी महिन्यात निवृत्ती देण्यात आली. त्याची निवृत्ती पोलिसांसाठी चटका लावणारी ठरली. आझादच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी आणखी एका श्वानाची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने बॉम्बशोधक पथकातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षकांकडून (हँडलर) नवीन श्वानाचा शोध सुरू करण्यात आला. बॉम्बशोधक पथकात सध्या लिमा, इको, तेजा, सूर्या, टायसन हे श्वान आहेत.

श्वानांची विक्री करणाऱ्या संस्थेकडून (केनल क्लब) काही महिन्यांपूर्वी लॅब्रोडर जातीच्या श्वानाच्या पिल्लाची खरेदी करण्यात आली. त्याचे ‘विराट’ असे नामकरण करण्यात आले असून सध्या त्याचे वय पाच महिने आहे. बॉम्बशोधक पथकासाठी लॅब्रोडर जातीचे श्वान उपयुक्त असतात. अन्य जातींच्या श्वानांच्या तुलनेत लॅब्रोडरची कार्यक्षमता चांगली असते.

बॉम्बशोधक पथकात दाखल झालेल्या विराटला प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे.  सुरूवातीच्या टप्प्यात त्याला प्रशिक्षकाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानंतर त्याला स्फोटके हुडकून काढण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती बॉम्बशोधक पथकातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

विराटला परीक्षा द्यावी लागणार

सध्या विराटला प्राथमिक प्रशिक्षण देण्यावर प्रशिक्षकांकडून भर देण्यात येणार आहे. त्याचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर त्याचा अधिकृतरीत्या बाँबशोधक पथकात समावेश करण्यात येईल. विराट परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. त्याला पुन्हा प्रशिक्षण देण्यात येईल. बाँबशोधक पथकातील श्वानाचे प्रशिक्षण पूर्णत: वेगळे असते. त्याच्या क्षमता तपासून प्रशिक्षण दिले जाते. बाँबशोधक पथकात स्फोटके हुडकून काढणारी यंत्रणा आहे. पण श्वान ही एक सजीव यंत्रणा (लाईव्ह इन्स्ट्रमेंट) आहे. त्यामुळे श्वानाला प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकाला कौशल्य पणाला लावावे लागते. बाँबशोधक पथकात सध्या बारा प्रशिक्षक (हँडलर) आहेत. प्रत्येक प्रशिक्षक पालकाप्रमाणे श्वानाची काळजी घेतो.

निवृत्तीनंतर आझादचे संगोपन

आझाद श्वानाच्या निवृत्तीनंतर त्याला बाँबशोधक पथकात ठेवण्यात येणार आहे. तेथेच त्याचे संगोपन करण्यात येईल. मात्र, त्याला यापुढील काळात कोणतेही काम देण्यात येणार नाही.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]