खरगपूरमधील भारतीय प्रौद्योगिकी संस्थेमध्ये ‘कॉम्प्युटर सायन्स’मध्ये अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या पुण्याच्या अभिषेक पंत या विद्यार्थ्याला ‘गूगल’ने तब्बल वार्षिक दोन कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. ‘गूगल’च्या कॅलिफोर्नियातील कार्यालयात डिझाईन विभागात काम करण्याची संधी अभिषेकला मिळणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हे वृत्त दिले आहे.
अभिषेकने या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘गूगल’च्या कॅलिफोर्नियातील कार्यालयात तीन महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले होते. त्यानंतर ‘गूगल’मध्ये निवड होण्यासाठी त्याला मुलाखतींच्या विविध टप्प्यांमधून पुढे जावे लागले. सर्व टप्प्यांवर उत्तीर्ण झाल्यावर त्याची निवड करण्यात आली आणि त्याला दोन कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्याची ऑफर देण्यात आली. अंतिम वर्षाची परीक्षा दिल्यावर अभिषक पुढील वर्षी ‘गूगल’मध्ये रुजू होऊ शकतो.
अभिषेकचा जन्म अमेरिकेत झाला. त्याचे सुरुवातीचे शिक्षणही तिथेच झाले. २००६ मध्ये त्याचे कुटुंबीय अमेरिकेतून पुण्यात आले. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत अभिषेकने पुण्यातून पहिला क्रमांक मिळवला होता.