गल्लोगल्लीच्या पुढाऱ्यांची फलकांद्वारे जाहिरात; शहर विद्रुपीकरणात भर
संस्कृतीच्या नावाखाली उत्सवात उन्माद माजवणाऱ्या खुणा शहरभर दिसू लागल्या आहेत. यंदा गोकुळाष्टमीला दहीहंडी फोडण्यासाठी चारच मानवी मनोरे लागणार असले तरी प्रत्येक चौकात उभारलेल्या दहीहंडीचे थर लाखात गेल्याचे चित्र आहे. मंडळाच्या दहीहंडीची जाहिरात करणाऱ्या मोठय़ा फलकांनी शहर विद्रुपीकरण सुरू केले आहे. याशिवाय या फलकांमुळे वाहनांना अडथळा निर्माण होईल अशा रीतीने उभे करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर नाव फलकावर झळकवण्यात स्थानिक दादा, भाई, राव. यांनी आघाडी घेतली आहे. यासाठी स्वत:चे दहीहंडी मंडळ स्थापन करण्यात आल्याने पावलागणिक नवी हंडी अशी परिस्थिती असल्याचे चित्र दिसत आहे.
पुण्यात काही वर्षांपासून पुण्यातील गोकुळाष्टमीच्या उत्सवाचे रूपांतर धिंगाण्यात झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी पाणी टंचाई आणि दुष्काळामुळे कमी असलेल्या उत्साहाची भरपाई या वर्षी करण्याचा चंगच अनेक मंडळांनी बांधला आहे. त्यातच येऊ घातलेल्या निवडणुकांनीही यात भर घातली आहे. चौकात हंडी उभारून आपले आणि डझनभर कार्यकर्त्यांचे नाव झळकवण्याची स्पर्धाच चौकाचौकात दिसत आहे. मोठय़ा हंडय़ा, लाखो रुपयांची बक्षिसे, मोठे कार्यक्रम, सिने किंवा मालिकेतील कलावंतांची हजेरी, लेझर शो, डीजे असे चित्र पुण्यातही दिसू लागले आहे. प्रत्येक चौकातील मंडळांमध्ये आता जास्त बक्षीस कुणाचे, मोठी हंडी कुणाची याची स्पर्धाही सुरू झाली आहे. शहराच्या मुख्य भागापेक्षाही उपनगरांमध्ये दहीहंडीचा धिंगाणा अधिक दिसत आहे. त्यानुसार अपवाद वगळता बहुतेक साऱ्या हंडय़ांसाठी लाखाच्या वर बक्षिसे असल्याचे दिसत आहे. एक लाखापासून २५ लाख रुपयांच्या बक्षिसांपर्यंतच्या रकमा हंडी फोडण्यासाठी ठेवल्या आहेत.

फलकबाजीने शहर बकाल
फ्लेक्स लावून शहराचे सौंदर्य बिघडवू नये, असे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश शहरातील दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या आणि महानगरपालिकेच्या खिजगणतीतही नसल्याचे दिसत आहे. मोठय़ा हंडीबरोबरच मोठे फलक उभारण्याची स्पर्धाही शिगेला पोहोचली आहे. शहरातील अनेक रस्ते मोठमोठय़ा फलकांनी अडवले आहेत. पदपथ आणि काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा होईल अशाप्रकारे बिनदिक्कतपणे फलक उभारण्यात आले आहेत. गोकुळाष्टमीला चार दिवस असताना आतापासूनच रस्ते खोदूनच उभ्या रहिलेल्या फलकांनी शहर विद्रुप केले आहे.

आर्चीची उपस्थिती
सैराटमधील आर्चीची भूमिका करणारी रिंकू राजगुरू हिच्यासह मालिका आणि चित्रपटातील कलावंत, रिअ‍ॅलिटी शो मधील विजेते उत्सवासाठी येणार असल्याची जाहिरातबाजी मंडळांकडून करण्यात येत आहे. जय मल्हार मालिकेतील म्हाळसाची भूमिका करणारी सुरभी हांडे, पूजा पवार, शर्वरी जमेनिस, पूजा घाटगे, सुरुची आडारकर हे कलावंत विविध ठिकाणी उपस्थित राहतील.