पुणे शहरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांत २७.४९ टीएमसी म्हणजेच तब्बल ९४ टक्के पाणीसाठा झाला आहे. दुपारी १ पासून १३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे.

शहराला खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झाला असून दोन दिवसांपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पानशेत ५७ मिमी, वरसगाव ५६ मिमी, खडकवासला धरण क्षेत्रात ३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या तिनही धरणांत १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. टेमघर धरण परिसरात ६० मिमी पावसाची नोंद झाली असून, हे धरण ६० टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात अद्यापही पाऊस सुरु असून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली होती. मात्र संध्याकाळी सातच्या दरम्यान पाण्याचा विसर्गाचा वेग कमी करण्यात आला आहे. सध्या खडकवासला धरणातून ९ हजार ४१६ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.