दुरुस्ती, देखभालीतील हलगर्जीपणामुळे धोका; विनाऑइलच्या सुरक्षित ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता
वीज वितरण यंत्रणेतील महत्त्वाचा घटक असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या धोक्याचा विषय महावितरण कंपनीकडून वेळोवेळी दुर्लक्षित केला जात असल्याचे दिसून येत आहे. चिंचवड येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका अपंग चर्मकाराचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर हा विषय पुन्हा प्रकर्षांने पुढे आला आहे. ऑइलचा वापर होत असलेल्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आगी लागल्याच्या अनेक घटना शहरात यापूर्वी घडल्या आहेत. हे ट्रान्सफॉर्मर शहराच्या दृष्टीने छुपे बॉम्बच ठरत आहेत. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती व देखभालीचा प्रश्नही समोर आला असून, विनाऑइलचे आधुनिक व सुरक्षित ट्रान्सफॉर्मर बसविण्याची गरज अधोरेखीत झाली आहे.
शहरामध्ये हजारोच्या संख्येने ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. त्यातील बहुतांश ट्रान्सफॉर्मर हे ऑइलचा वापर असणारे आहेत. काही ट्रान्सफॉर्मर अत्यंत दाट वस्तीमध्ये आहेत. ट्रान्सफॉर्मरमधून ऑइलची गळती होऊन आग लागणे त्याचप्रमाणे त्याचा थेट स्फोटच होण्याच्या घटना यापूर्वीही शहरात अनेकदा घडल्या आहेत. त्यात खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच काही जण जखमीही झाले आहेत. चिंचवड येथे ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात दुकानांचे नुकसान होण्याबरोबरच एकाला जीवही गमवावा लागला. स्फोटापूर्वी या ट्रान्सफॉर्मरमधून ऑइलची गळती होऊन ठिणग्याही पडत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. त्यामुळे संबंधित ट्रान्सफॉर्मरबरोबरच सर्वच ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल व दुरुस्तीचा मुद्दा समोर आला आहे.
वीजयंत्रणेच्या देखभालीसाठी गुरुवार हा अधिकृत दिवस महावितरण कंपनीला देण्यात आला आहे. या दिवसाला सात ते आठ तास वीजपुरवठा बंद ठेवून देखभालीची कामे केली जातात. या कामांमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या देखभालही महत्त्वाची आहे. मात्र, ही देखभाल खरोखरच योग्य रीत्या होते का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. देखभालीच्या प्रश्नाबरोबरच ऑइल असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून ऑइलची चोरी होण्याच्या घटनाही अनेकदा घडतात. त्यामुळेही ट्रान्सफॉर्मरबाबत धोका निर्माण होतो. त्यामुळे विनाऑइलचे नवे ट्रान्सफॉर्मर शहरात बसविण्याची मागणी करण्यात येत होती. नव्याने ट्रान्सफॉर्मर बसविताना ते विनाऑइलचे बसविले जातील, असे महावितरणकडून मागे सांगण्यात आले होते. त्याची किती अंमलबजावणी झाली किंवा जुन्या ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल-दुरुस्तीबाबत महावितरणकडून कोणती पावले उचलण्यात आली, याची माहिती महावितरणने जाहीर करावी, अशी मागणी सध्या करण्यात येत आहे.