बहुजन क्रांती मोर्चानिमित्त रविवारी (१८ डिसेंबर) मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

बहुजन क्रांती मोर्चाचा प्रारंभ रविवारी सकाळी अकराच्या सुमारास डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून होणार आहे. मोर्चाला होणारी गर्दी विचारात घेऊन संपूर्ण मोर्चाच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या मोर्चात १३१ संघटना सहभागी होणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मोर्चाचा मार्ग तसेच मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मोर्चाची सांगता झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

डेक्कन, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, संत कबीर चौक, उजवीकडे वळून रास्ता पेठ पॉवर हाऊस चौक, समर्थ पोलीस ठाणे, नेहरू मेमोरिअल हॉल, विधान भवन (कौन्सिल हॉल) या मार्गाने मोर्चा जाणार आहे.

वाहतुकीस बंद राहणारे रस्ते पुढीलप्रमाणे- बोल्हाई चौक ते पुणे रेल्वे स्थानक, साधु वासवानी पुतळा ते पुणे रेल्वे स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (जिल्हाधिकारी कार्यालय) ते मुख्य टपाल कार्यालय (जीपोओ), पॉवर हाऊस चौक ते बॅनर्जी चौक, किराड चौक ते स्टेट बँक ऑफ इंडिया, सर्कीट हाऊस चौक ते अलंकार चित्रपटगृह चौक, नेहरू मेमोरिअल हॉल ते जे. जे. गार्डन (लष्कर), प्रादेशिक परिवहन कार्यालय चौक ते बोल्हाई चौक, संचेती हॉस्पिटल चौक ते शाहीर अमर शेख चौक, क्वार्टर गेट चौक ते शांताई हॉटेल चौक, अपोलो चित्रपटगृह ते शांताई हॉटेल चौक

पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे-स्वारगेट भागातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जेधे चौक, जमनालाल बजाज पुतळा, दांडेकर पूलमार्गे शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलीस चौकी, म्हात्रे पूल, नळस्टॉप या मार्गाचा वापर करावा. टिळक रस्त्याने डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलीस चौकी, म्हात्रे पुलावरून इच्छित ठिकाणी पोहोचावे. पूरम चौकापासून बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

शिवाजी रस्ता गाडगीळ पुतळा चौकापासून वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे.