विनाहेल्मेट पेट्रोल न देण्याच्या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया, असहकाराची भूमिका

‘हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही’ या परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या घोषणेवर शुक्रवारी पुण्यात स्वाभाविकच तीव्र प्रतिक्रिया उमटली. पुणेकरांनी हेल्मेटसक्तीच्या विरोधात ‘मोडेन पण वाकणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे. रावते यांनी सक्तीची घोषणा करताच ‘पुणेरी बाणा’ प्रकट करण्याची पुरेपूर संधी पुणेकरांना मिळाली असून या सक्तीला शहरात शुक्रवारी गांधीगिरीने प्रत्युत्तर देण्यात आले. समाजमाध्यमांमध्येही या सक्तीवर खास पुणेरी शैलीत टीका सुरू आहे.

हेल्मेटसक्ती लादण्याची गरज नाही, अशी पुणेकरांची भूमिका आहे. त्यालाच जोडून रावते कोणत्या कायद्यानुसार पेट्रोल नाकारत आहेत, असाही प्रश्न पुणेकर विचारत आहेत. रावते यांच्या घोषणेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने शहरात पेट्रोल पंपांवर गांधीगिरी केली. सातारा रस्त्यावर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागूल यांनी सक्तीला विरोध म्हणून नागरिकांना एक रुपये नाममात्र भाडय़ाने पेट्रोल भरण्यासाठी हेल्मेट उपलब्ध करून दिली. शहरातील वाहनांचा वेग पाहता हेल्मेटसक्ती फक्त महामार्गावरच करावी. शहरात हेल्मेटसक्तीची गरज नाही आणि मुळात पेट्रोल कोणत्या कायद्याने नाकारले जाणार आहे, अशीही विचारणा या वेळी दुचाकीधारक करत होते. शहरातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे काम हाती घ्या, नंतर नागरिकांवर सक्ती लादा, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पेट्रोल डिलर्स असोसिएशनचाही सक्तीला तीव्र विरोध आहे.

हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांना पेट्रोल दिले गेले, तर कारवाई कोणावर करणार, दुचाकीचालकावर का पेट्रोलपंपचालकावर असाही प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. मुख्य म्हणजे यावर कोणाचे आणि कसे नियंत्रण असणार याचाही खुलासा मागण्यात येत आहे. शासनाच्या निर्णयाची समाजमाध्यमांमध्ये पुरेपूर खिल्ली उडवण्यात येत असून काही व्यंगचित्रही माध्यमांमध्येही फिरत आहेत. महापालिका हद्दीत सक्ती नको, अशा स्वरूपाचे संदेशही वेगाने पसरत आहेत.

हेल्मेटसक्ती समाजमाध्यमात..

हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही मग ज्या रस्त्यावर खड्डा असेल

त्या अधिकाऱ्याला पगार नाही..

ही पण सक्ती करा..

नवी पुणेरी पाटी!

आमचेकडे पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरून येण्यापुरते हेल्मेट भाडय़ाने मिळेल!

हेल्मेटसक्तीचा निर्णय चुकीचा असून शासनाने घेतलेल्या या निर्णयातून काहीही साध्य होणार नाही. उलट, ग्राहकांची आणि पेट्रोल पंपचालकाची फरपटच होईल. ज्या परिवहन विभागाला पुणे-मुंबई हा १०० किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग अपघातमुक्त करता आला नाही, तेच आता आख्ख्या महाराष्ट्रातील दुचाकीचालकांच्या डोक्यावर हेल्मेट बसवून अपघात कमी करण्याची भाषा करत आहेत.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच