पाणीपुरवठा, वाहतूक नियोजन तसेच नवे रस्ते, पूल, मेट्रो आदींसाठी भरीव तरतूद करणारे आणि कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी शुक्रवारी स्थायी समितीला सादर केले. सन २०१४-१५ या वर्षांचे हे अंदाजपत्रक तीन हजार ६०८ कोटींचे असून कोणत्याही नव्या योजना जाहीर न करता सुरू असलेली कामे पूर्ण करण्यावर या अंदाजपत्रकात भर देण्यात आला आहे.
महापालिकेच्या नव्या सभागृहातील कामकाजाचा प्रारंभ शुक्रवारी आयुक्तांच्या अंदाजपत्रक सादरीकरणाने झाला. स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे आयुक्तांनी अंदाजपत्रकाची प्रत सादर केली. शहराची भविष्यातील वाढ लक्षात घेऊन अंदाजपत्रकात सर्वाधिक भर पाणीपुरवठय़ाच्या योजनांवर देण्यात आला आहे. पर्वती ते लष्कर जलकेंद्रादरम्यान नवी दाबनलिका, पर्वती येथे नवे जलशुद्धीकरण केंद्र, वडगाव येथे नवे जलकेंद्र, भामा आसखेड धरणातून पाणी आणणे, खडकवासला येथे जॅकवेल, वारजे येथे नवे जलकेंद्र आदी कामे या वर्षांत पूर्ण करण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.
वाहतूक नियोजनासाठी अंदाजपत्रकात २३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात डेंगळे पुलाशेजारी नवीन पूल, कात्रज चौकात उड्डाणपूल व भुयारी मार्ग, बोपोडी सांगवी येथे मुळा नदीवर पूल, सुतारवाडी येथे भुयारी मार्ग, चांदणी चौक येथे बहुमजली उड्डाणपूल तसेच अन्य काही ठिकाणी उड्डाणपुलांसाठी आयुक्तांनी तरतूद केली आहे. बहुचर्चित मेट्रो प्रकल्पासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली असून मंजुरी मिळताच यंदा मेट्रोचे काम सुरू केले जाईल, असे आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर करताना सांगितले.
पथ विभागासाठीही २७६ कोटींची तरतूद करण्यात आली असून विकास आराखडय़ातील रस्ते विकसित करणे, पुनर्डाबरीकरण, चौक सुधारणा, रस्त्याचे काँक्रिटीकरण, पदपथ-सायकल ट्रॅक, पूल आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत यंदा ३६४ कोटींचे अनुदान अपेक्षित करण्यात आले आहे. त्यातून पीएमपीसाठी तीनशे नव्या गाडय़ा खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे.
उद्यान विभागातर्फे यंदा छत्रपती संभाजी उद्यान येथे विस्तारित इमारत, विविध ठिकाणी उद्याने विकसित करणे, पु. ल. देशपांडे उद्यानात दिल्ली हटच्या धर्तीवर कलाग्रामची उभारणी आदी योजना प्रस्तावित आहेत. नागरवस्ती विकास योजनेच्या माध्यमातून यंदा जेंडर स्टेटस रिपोर्ट तयार करून घेतला जाणार असून असा अहवाल तयार करून घेणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका आहे.
हडपसर येथील राजर्षी शाहू महाराज स्मारक, बाणेर येथील रुग्णालय, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन, बालेवाडी येथील कबड्डी स्टेडियम, तसेच बालेवाडी व वडगाव येथील ई-लर्निग स्कूल, महापालिकेच्या जुन्या इमारतींचे परीक्षण आदी कामे भवन रचना विभागामार्फत प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्याबरोबरच जुने व अतिमहत्त्वाचे रेकॉर्ड जतन करण्यासाठी डिजिटलायझेशन, महात्मा फुले मंडईचे जतन व संवर्धन, महापालिका शाळातील ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी मार्गदर्शन यासह अनेक योजना व कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यासाठी अंदाजपत्रकात तरतुदी करण्यात आल्या आहेत.