पुणे शहरात प्रशासनाने नालेसफाई योग्य प्रकारे न केल्याने सत्ताधारी पालिकेच्या निषेधार्थ सर्व साधारण सभेत राष्ट्रवादी कॉग्रेसने प्रतिकात्मक बोट आणून आंदोलन केले. नाले सफाईच्या कामातील ढिसाळ कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेने देखील नाले सफाईचा मुद्दा उचलून धरला आहे. विरोधी पक्षांचा नालेसफाई संदर्भातील रोषावर अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रशासनाकडून स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, नालेसफाईच्या मुद्यासंदर्भात प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली जाणार आहे. या विषयीचा अहवाल नगरसचिव कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. तसेच नालेसफाईचे कामे युध्दपातळी केले जाईल.

मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी कात्रज भागात पहिल्याच पावसात बहुतांश भागात पाणी साचल्याच्या घटनेचा दाखला दिला. तर शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी प्रशासनावर शहरातील पाणी साठण्याच्या घटनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे सांगत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की, पुणे शहरात पहिल्याच पावसात प्रशासनाकडून दिलेल्या मुदतीमध्ये नालेसफाई योग्य प्रकारे करण्यात आली नसून त्या कामासाठी कोट्यावधी रूपये वाया गेल्याचा दावा केला. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले, अशी टिका देखील त्यांनी केली.