सभागृहापुढे येण्याची मुंढे यांची हिंमत नाही; सर्वपक्षीय नगरसेवकांची मुंढेच्या कार्यपद्धतीवर टीका

शहरातील खासगी शाळांना पीएमपीकडून पुरविण्यात येत असलेल्या विशेष विद्यार्थी बससेवा गाडय़ांच्या दरात वाढ केल्याच्या मुद्दय़ावरून पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे पुन्हा एकदा सर्वपक्षीय नगरसेवकांचे ‘लक्ष्य’ ठरले. संचालक मंडळाला विश्वासात न घेता मुंढे एकाधिकारशाहीने निर्णय घेत आहेत, महापौरांच्या आदेशालाही ते जुमानत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी लागेल, अशा शब्दात नगरसेवकांनी मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. मुंढे यांची सभागृहात येण्याची हिंमत नाही. ते सभागृहात येण्यास तयार नसतील तर पीएमपी कंपनी बरखास्त करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

खासगी शाळांच्या बससेवेमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ शहर शिवसेनेकडून महापालिका मुख्य भवनात मंगळवारी गटनेता संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काही विद्यार्थीही सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर दरवाढीच्या निर्णयाचे पडसाद मुख्य सभेतही उमटले.

दरवाढीच्या निर्णयामुळे अनेक शाळांनी बससेवा नाकारली आहे. पीएमपीमध्ये पुणे महापालिकेचा साठ टक्क्य़ांचा हिस्सा असतानाही हुकूमशाही पद्धतीने मुंढे वागत आहेत. संचालक मंडळाला न विचारता परस्पर ही दरवाढ करण्यात आली आहे. दरवाढ मागे घेण्यासंदर्भात महापौरांनी दिलेल्या पत्रालाही केराची टोपली दाखविण्यात आली आहे. सभागृहात येण्याची मागणीही त्यांनी धुडकावून लावली आहे, असे आरोप यावेळी करण्यात आले.

भाडेवाढीचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य समज देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक बापूराव कर्णे-गुरुजी यांनी केली. संचालक मंडळाला विश्वासात न घेता झालेला हा निर्णय म्हणजे म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो आहे, असा आहे. अधिकाऱ्यांमध्ये गुर्मी निर्माण होणे योग्य नाही, असे गोपाळ चिंतल यांनी स्पष्ट केले. एका व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे कोणताही निर्णय होऊ नये, असे विरोधी पक्षनेता चेतन तुपे यांनी सांगितले. मुंढे यांना नकारात्मक प्रसिद्धी आवडत आहे, पण सभागृहापुढे येण्याची त्यांची हिंमत नाही, अशा शब्दात काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी टीका केली. तर पीएमपीला संचलनातील तूट, अनुदान दिली जाते. त्यामुळे हा निर्णय घेताना संचालक मंडळाला त्याची माहिती मिळणे अपेक्षित होते, असे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी स्पष्ट केले.

खासगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पीएमपी बसगाडय़ांच्या दरामध्ये अडीच पटीने वाढ करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी प्रतिकिलोमीटर ६१ रुपये असलेले शुल्क १४१ रुपये करण्यात आले आहे. या दरवाढीच्या मुद्दय़ावरून तुकाराम मुंढे आणि महापालिकेचे पदाधिकारी आमने-सामने आले आहेत. यापूर्वी महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेता श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनीही मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली होती.

दरवाढीच्या मुद्दय़ावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा

बसच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेताना संचालक मंडळाला कोणतीही विचारणा करण्यात आली नव्हती, अशी माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी सभागृहात दिली. दैनंदिन कामकाजाचे अधिकार पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना आहेत. धोरणात्मक निर्णय संचालक मंडळ घेते, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, संचालक मंडळाची बैठक बुधवारी (२८ जून) होणार आहे. या बैठकीमध्ये दरवाढीच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.