बडी कॉप व्हॉटसअ‍ॅप समूहावर महिलेची तक्रार

खराडी भागातील एका खासगी कंपनीतील कर्मचारी महिलेचे प्रसाधनगृहात चित्रीकरण करणाऱ्या विकृत तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली. महिलेने पोलिसांच्या बडीकॉप व्हॉटसअ‍ॅप समूहावर तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.

राजकमल राजबहाद्दुर यादव (वय २४, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला ही खराडी भागातील वर्ल्ड ट्रेड सेंटर टॉवरमधील एका कंपनीत एच. आर. विभागात कर्मचारी आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे काम सुरु असल्याने ती मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कंपनीत थांबली होती. रात्री साडेआठच्या सुमारास ती प्रसाधनगृहात गेली. तेव्हा कोणीतरी प्रसाधनगृहाच्या भिंतीवर चढून मोबाईलवरुन चित्रीकरण करत असल्याचा तिला संशय आला. तिने आरडाओरडा केला. तेव्हा शेजारील असलेल्या प्रसाधनगृहातून यादवला पसार होताना तिने पाहिले. त्यानंतर तिने कंपनीतील अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. तक्रारदार महिलेने खासगी तसेच आयटी कंपनीतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरु करण्यात आलेल्या बडीकॉप व्हॉटसअ‍ॅप समूहावर तक्रार नोंदवली.

दरम्यान, पसार झालेल्या यादव याला सुरक्षारक्षकांनी पकडले. चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांकडून यादव याला अटक करण्यात आली. यादव हा पूर्वी वर्ल्ड ट्रेड सेंटर टॉवरमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. पोलीस निरीक्षक पाथ्रुडकर पुढील तपास करत आहेत.

बडीकॉपवर तक्रार केल्यानंतर तीन जण अटकेत

आयटी कंपनीतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून बडीकॉप व्हॉटसअ‍ॅप समूह सुरु करण्यात आला आहे. खराडीतील आयटी कंपनीतील सहकारी तरुणीला त्रास दिल्याप्रकरणी किशोर औटी (वय ३०) याला अटक करण्यात आली होती. तसेच रविवारी (२३ एप्रिल) एका तरुणीला कोरेगाव पार्क भागात बोलावून विवाहासाठी धमकावणाऱ्या गोपालसिंग (रा. जम्मू-कश्मीर) याला अटक करण्यात आली. बडी कॉप व्हॉटसअ‍ॅप समूहावर तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती.