पुणे ते दौंड दरम्यान रेल्वेची सेवा विस्तारण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या बहुप्रतीक्षित लोहमार्ग विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या कामाच्या पूर्ततेमुळे या मार्गावर गाडय़ांचा वेग वाढून जादा गाडय़ा सुरू होण्याबरोबरच पुणे- दौंड मार्गाबरोबरच थेट लोणावळा ते दौंड लोकलही सुरू करता येणार आहे.  रेल्वेकडून पुढील काही दिवसांत विविध तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात लोकल धावू शकणार आहे.
प्रवासी संघटनांच्या वतीने या मार्गाच्या विद्युतीकरणाबाबत मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून मागणी  करण्यात येत होती. पुणे- दौंड मार्गावर सध्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. रेल्वे मार्गालगतच्या भागातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, तसेच कामगार व व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. पुणे- सोलापूर रस्तामार्गावरील प्रवासाऐवजी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिले जाते. अशा परिस्थितीत या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेच्या पॅसेंजर व एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते. गाडय़ांमध्ये अक्षरश: पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. अशा वेळी अनेकदा वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे गाडय़ांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. त्याकडेही लक्ष दिले जात नसल्याची प्रवाशांची तक्रार होती. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता त्याचा फायदा रेल्वेलाच होणार आहे. मात्र, या मार्गावरील कामांबाबत रेल्वे प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही होत नव्हती.
ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्येही विद्युतीकरणाची रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामाच्या निविदा काढण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मात्र विद्युतीकरणाचे हे काम रेंगाळले होते. पुणे विभागासाठी असलेला निधी बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात पळविला असल्याने हा निधी मिळाला नसल्याचा आरोपही त्या वेळी करण्यात येत होता. मंजुरी मिळूनही सुमारे पाच ते सहा वर्षे प्रकल्प रखडला होता. सुमारे तीन वर्षांपूर्वी निधी मिळाल्याने प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली होती.
मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू ठेवून काम करण्यात आल्याने या कामाला उशीर झाला असला, तरी आता हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. खासदार सुप्रीया सुळे यांनीही नुकताच विद्युतीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. महापारेषण कंपनीच्या अखत्यारीत येणारी उच्चदाब वाहिनी, यवत व दौंड येथील वीज उपकेंद्र आदी कामे जवळपास पूर्ण झालेली आहेत. विद्युतीकरणाच्या तांत्रिक कामांची पूर्तता झाल्याचे महापारेषणचे अधीक्षक अभियंता अनिल कोलप यांनी सुळे यांच्याशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. पुढील महिन्यामध्ये रेल्वेकडून पुणे- दौंड मार्गाची तपासणी, रेल्वेमार्गाचे अंतर्गत परीक्षण, प्रत्यक्ष लोकलचे चाचणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संरक्षण विभागाशी निगडित असणाऱ्या प्रश्नांबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक २८ मार्चला सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी. के. दादाभोय यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.