अतिरिक्त डबे जोडण्याचा मध्य रेल्वे पुणे विभागाचा निर्णय

दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर पुण्यातून दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा हाऊसफुल्ल झाल्या असून, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुणे- निजामुद्दीन या नेहमीच्या गाडीबरोबरच सुटीच्या कालावधीत सोडण्यात येणाऱ्या विशेष गाडीलाही अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या गाडय़ांवरील प्रवाशांचा ताण काहीसा कमी होऊ शकणार आहे.

दिवाळीच्या कालावधीत जवळपास सर्वच गाडय़ांना मोठय़ा प्रमाणावर आरक्षण असले, तरी प्रामुख्याने उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर काही विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या असल्या तरी प्रवाशांची मागणी अधिक आहे.

आणखी गाडय़ा सोडणे शक्य नसल्याने आरक्षणाची मागणी लक्षात घेऊन सध्या सुरू असलेल्या गाडय़ांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वेच्या पुणे विभागाकडून देण्यात आलेली माहिती

पुणे- निजामुद्दीन या मार्गावर धावणाऱ्या नियमित गाडीला व हॉलिडे स्पेशल गाडीला प्रत्येकी एक सेकंड एसी, तर दोन थर्ड एसी या प्रकारातील अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. पुणे-निजामुद्दीन एक्स्प्रेस गाडीला निजामुद्दीनवरून ३० सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत, तर पुण्यावरून २ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत अतिरिक्त डबे असतील. हॉलिडे स्पेशल निजामुद्दीन गाडीला निजामुद्दीनवरून २७ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत, तर पुण्याहून २९ सप्टेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अतिरिक्त डबे जोडण्यात येतील. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.