पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपतींच्या दर्शनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) येत्या रविवारी आणि मंगळवारी सहल (२० व २२ सप्टेंबर) सहल आयोजित केली आहे. या सहलीत दिवसभरात सात गणपतींचे दर्शन घडवण्यात येणार आहे.
पुण्यातील गणेशोत्सवाबाबत अनेकांना कुतूहल व उत्सुकता असते. मानाचे गणपती पाहण्यासाठी बाहेरगावाहून मोठय़ा संख्येने भाविक येतात. त्यांची सोय व्हावी आणि त्यांना व्यवस्थित दर्शन घेता या उद्देशाने ही सहल आयोजित करण्यात आली आहे. त्यात मानाचे पहिले पाच गणपती – कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा तसेच, दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि हुतात्मा बाबू गेनू या मंडळांच्या गणपतीचे दर्शन घडवण्यात येणार आहे. ही सहल सकाळी आठ ते सायंकाळी पाच या काळासाठी असेल. त्यात न्याहरी व जेवणही दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी एक हजार एक रुपये इतकी रक्कम आकारण्यात येणार आहेत. या सहलीसाठी नाव नोंदवायचे असल्यास पुणे स्टेशनजवळील मध्यवर्ती शासकीय इमारतीतील महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा ०२०-२६१२६८६७ / २६१२८१६९ या क्रमांकांवर  साधावा. याबाबत www.maharashtratourism.gov.in या वेबसाइटवर माहिती मिळेल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

मंडईऐवजी बाबू गेनू
पुण्यातील परंपरागत मानाच्या पाच गणपतींबरोबरच इतर मानाच्या गणपतींमध्ये प्रामुख्याने दगडूशेठ हलवाई मंडळाच्या व अखिल मंडई मंडळाच्या गणपतींचा समावेश होतो. पर्यटन महामंडळाने मात्र आपल्या सहलीत मंडईच्या गणपतीचा समावेश केलेला नाही. मात्र, बाबू गेनू मंडळाच्या गणपतीचा समावेश केला आहे. याबाबत महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली चव्हाण यांनी सांगितले, की प्रतिष्ठेच्या दगडूशेठ मंडळ, मंडई मंडळ आणि बाबू गेनू मंडळ या तीनही गणपतींचा सहलीत समावेश करण्यात येणार होता. मात्र, मंडई मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे या सहलीत या गणपतीचा समावेश करता आला नाही.