पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आश्वासन घेत पुण्यातील भाविकांनी बुधवारी आणि गुरुवारी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. विसर्जन सोहळ्यावर वरूणराजाने मुक्तहस्ते सरींची उधळण केल्यानंतर यंदाची मिरवणूक २७ तास २५ मिनिटांत संपली. आकाशातून सरींवर सरी कोसळत असतानाही कार्यकर्त्यांमधील उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या अखंड जयघोषात पुणेकरांनी बाप्पाला निरोप दिला आणि गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मंगलमय सोहळ्याची सांगता झाली.
क्षणचित्रे

  • सकाळी साडेदहा वाजता महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते मानाच्या गणपतींची पूजा झाल्यानंतर मंडईतील टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
  • पंरपरेप्रमाणे मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आणि दुसऱया तांबडी जोगेश्वरीची मिरवणूक पालखीतून काढण्यात आली
  • मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाने मिरवणुकीसाठी पुष्प सजावट केलेला रथ तयार केला होता
  • मानाचा चौथा तुळशीबाग मंडळाची फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक
  • मानाचा पाचवा केसरीवाड्याची गणेशमूर्ती फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान झाली होती
  • मानाच्या सर्वच गणेश मंडळांमध्ये सुरुवातीपासूनच मोठे अंतर
  • सकाळी साडेदहाला मिरवणूक सुरू झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अवघी २० मंडळे बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावर मिरवणुकीत सहभागी झाली होती मंडळातील ढोल पथकांवर पोलिसांनी निर्बंध घातल्यामुळे सर्वच मंडळात जास्तीत जास्त तीनच वाद्यपथके होती
  • लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या सह इतरही मिरवणूक मार्गांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त
  • दुपारपासूनच पुण्यामध्ये पावसाच्या सरी बरसत होत्या. संध्याकाळी सव्वानऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पावणेदोन वाजेपर्यंत पाऊस पडत होता
  • लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीतील प्रमुख आकर्षण असलेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई मंडळ, जिलब्या मारुती मंडळ, बाबू गेनू आणि भाऊ रंगारी मंडळ हे गेल्यावर्षीपेक्षा यंदा लवकर मिरवणुकीत सहभागी
  • जिलब्या मारुती मंडळ संध्याकाळी साडेआठच्या सुमारास बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभागी. मंडळाने यंदा पुष्परथ साकारला होता
  • बाबू गेनू मंडळाचा रथ रात्री नऊच्या सुमारास बेलबाग चौकात दाखल 
  • भाऊ रंगारी मंडळाचा पारंपरिक रथ साडेनऊच्या सुमारास मिरवणुकीत सहभागी झाला
  • अखिल मंडई मंडळाने यंदा तिरुपती रथ तयार केला होता. या रथावर फुलांची सजावटही करण्यात आली होती
  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाने शेषात्मज गणेश रथ साकारला होता. सोन्याच्या विविध दागिन्यांनी नटलेली गणरायाची देखणी मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी भरपावसात दुतर्फा गर्दी केली होती
  • लक्ष्मी रस्त्यावरून १८२ मंडळांच्या ‘श्रीं’चे विसर्जन