लष्कर भागातील तारांकित हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका मॉडेलिंग करणाऱ्या तरुणीला पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी (२४ ऑक्टोबर) रात्री पकडले. या तरुणीसह पोलिसांनी या प्रक रणात संबंधित दलालासही पकडले आहे. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करून त्या तरुणीची सोमवारी मध्यरात्री हडपसर भागातील महिलांच्या निरीक्षण गृहात रवानगी केली. मात्र, मंगळवारी सकाळी निरीक्षणगृहात बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसाला धक्काबुक्की करून ती पसार झाली.

या वेश्याव्यवसायातील दलाल विपूल पवनबहाद्दुर दहाल (वय २८, सध्या रा. आनंद पार्क , वडगाव शेरी, मूळ रा. उदलगुडी, आसाम) याला पोलिसांनी अटक केली असून महिला पोलीस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी मॉडेल अर्शा खान (वय २७, रा. मुंबई, मूळ रा. भोपाळ, मध्य प्रदेश) हिच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहाल याचे साथीदार रोहन (रा. मुंबई) आणि कृष्णा कफाले (रा. विमाननगर, मूळ रा. आसाम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लष्कर भागातील एका तारांकित हॉटेलमध्ये कृष्णा नावाचा दलाल वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना मिळाली होती.

सोमवारी (२४ ऑक्टोबर) रात्री पोलिसांनी तेथे सापळा लावला. खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहकाला तेथे पाठवण्यात आले. दलालाशी बनावट ग्राहकाने संपर्क साधला. व्यवहार ठरल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. हॉटेलमधील एका खोलीतून मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीची सुटका करण्यात आली.

दलाल दहाल याला पकडण्यात आले. पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव, शीतल भालेकर, जमादार, शैलेश जगताप आदींनी  ही कारवाई केली.

निरीक्षणगृहातून पसार

पोलिसांनी या कारवाईत मॉडेल अर्शा खानला ताब्यात घेतल्यानंतर तिला हडपसर भागातील महंमदवाडी येथे असलेल्या रेस्क्यू फाऊंडेशनच्या निरीक्षण गृहात मध्यरात्री दाखल केले. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास निरीक्षणगृहातील सफाई कर्मचारी तेथे आला. बंदोबस्तासाठी पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपाई कादंबरी लोढी तेथे होत्या. त्यावेळी अर्शा खानने पोलीस शिपाई लोढींना धक्काबुक्की केली. तेथे गोंधळ उडाला. दरम्यान, अर्शा खान तेथून पसार झाली. लोढी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खानविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पसार झालेल्या खान हिचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.