सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये रस्त्यावर मद्यपान करणाऱ्यांनाही ‘सुरक्षित’ वातावरण निर्माण झाल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहे. विविध रस्ते, अंडाभुर्जी, चायनिजच्या गाडय़ा, बागांचे परिसर व गल्ल्यांमध्ये रात्री मद्यपींचे अड्डे निर्माण झाले आहेत. रस्तोरस्ती सुरू झालेल्या या खुल्या मद्यालयांमध्ये सुरू असलेल्या धिंगाण्याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. गल्लोगल्लीच्या ‘दादा’, ‘भाईं’ची नावे सांगून ही मंडळी नागरिकांना दमदाटी करतात, तर कधी या खुल्या मद्यालयांमध्ये मारामारीच्या घटनांबरोबरच महिलांची छेडछाड करण्याच्या गंभीर घटनाही घडत आहेत.
रस्त्याच्या अंधाऱ्या भागामध्ये गुपचूप मद्यपान करणारे मद्यपी मागील काळातही शहरातील अनेक भागात दिसत होते. मात्र, आता केवळ ‘देशी’च नव्हे, तर ‘विदेशी’चा प्याला रिचविणारेही मोठय़ा प्रमाणावर मद्यपानासाठी रस्त्यालगतच्या जागांचा अगदी खुलेआमपणे वापर करीत असल्याने दिसून येत आहे. त्यामुळे या खुल्या मद्यालयांची व्याप्ती वाढली असून, त्यातून विविध धोके निर्माण झाले आहेत. रात्रीच्या वेळेला अंडाभुर्जी व चायजिनच्या बहुतांश गाडय़ा या खुल्या मद्यालयांसाठीच चालविल्या जात असल्याचे दिसून येते. मद्य पिण्यासाठी प्याले व पाण्याचीही व्यवस्था या ठिकाणी करून दिली जाते.
प्रामुख्याने मद्य विक्रीच्या दुकानांच्या परिसरामध्ये रस्त्यावर सर्रास मद्यपान सुरू असते. त्यासाठींच्या प्लास्टिकच्या प्याल्यांची विक्रीही याच दुकानातून केली जाते. काही मद्य विक्रेत्यांकडून मागील किंवा शेजारच्या भागामध्ये मद्यपान करण्यासाठी ‘सोय’ही करून दिली जाते. त्याचप्रमाणे मद्य विक्रीच्या दुकानाजवळील काही हॉटेलचालकांकडूनही ही ‘सोय’ केली जाते. शहरामध्ये प्रामुख्याने हिराबाग परिसरातील चायनिजचे स्टॉल, सारसबाग परिसरातील अंडाभुर्जीच्या गाडय़ा, सिंहगड रस्ता, मंडई परिसरातील अंडाभुर्जीच्या गाडय़ा, गोटीराम भैया चौक परिसर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसरातील जेधे चौक, वडगाव धायरी, येरवडा त्याचप्रमाणे उपनगर व िपपरी- चिंचवड परिसरातील बहुतांश ठिकाणी खुल्या मद्यालयांचे पेव फुटलेले दिसते आहे.
रस्त्यांवरील खुल्या मद्यालयात वावरणारी बहुतांश मंडळी गुंड स्वरुपाची असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांना याबाबत हटकल्यास उलट तेच नागरिकांना दम भरतात. बहुतांश भागामध्ये स्थानिक गुंडांच्या आशीर्वादानेच हे धंदे सुरू असल्याने त्या विरोधात अनेकदा भीतीपोटी तक्रारही केली जात नाही. त्यातून या मंडळींचे फावते आहे. अनेकदा या खुल्या मद्यालयांमधील मद्यपींमध्ये मारामाऱ्याही होतात. मोठमोठय़ाने ओरडण्याच्या आवाजाने नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत या मद्यपींना काहीही घेणेदेणे नसते. याबाबत आक्षेप घेणाऱ्या नागरिकांना मारहाण करण्याचे प्रसंगही अनेकदा घडले आहेत.
मुख्य म्हणजे रात्री शहराच्या सर्वच रस्त्यांवरून महिलांचा व तरुणींचा वावर असतो. या खुल्या मद्यालयांचा त्रास सर्वाधिक याच महिला व तरुणींना होतो आहे. मद्यपींकडून त्यांची छेडछाड होण्याचे प्रकारही शहरामध्ये घडत आहेत. शहरातील अधिकृत मद्यालयांमधील गर्दी हळूहळू रस्त्यावर उतरत असताना निर्माण होणाऱ्या धोक्याकडे पोलिसांनी अद्यापही कानाडोळा केला आहे. त्यामुळे लुटुपुटुची नव्हे, तर या खुल्या मद्यालयांच्या विरोधात एकाच वेळी व्यापक मोहीम पोलिसांनी उभारून शहराचे सुरक्षितपण अबाधित ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.