विमानतळ प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुण्यासाठी नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे होणार, या प्रश्नाचे उत्तर अखेर स्पष्ट झाले आहे. विमानतळ प्राधिकरणाने पुरंदरच्या जागेला मान्यता दिल्याने तेथे विमानतळ उभारण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पुरंदरच्या विमानतळाबाबत येत्या आठ दिवसात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) बैठक बोलविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ चाकण परिसरात करण्याबाबत गेली अनेक वर्षे चर्चा केली जात होती. या ठिकाणी, त्याचप्रमाणे खेड परिसरातही जागांची पाहणी करण्यात आली होती. विमानतळ येणार असल्याने या भागालगतच्या जागांना मोठी मागणी येऊन किंमतीही वाढल्या. मात्र, नंतर हा विषय मागे पडला.

काही दिवसांपूर्वी अचानक विमानतळासाठी पुरंदर परिसरातील जागेचा विषय पुढे आला. विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने तीन आठवडय़ांपूर्वी पुणे- जेजुरी मार्गावरील राजेवाडी परिसरातील जागेची पाहणी करून शासनाला सकारात्मक अहवाल सादर केला.

मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगितले, की पुण्याच्या विमानतळासाठी पुरंदरच्या जागेची विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने दोनदा पाहणी केली. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी अहवाल दिला असून, या जागेला विमानतळासाठी मान्यता असल्याचे पत्रही दिले आहे. नागरिकही याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे विमानतळ उभारणीबाबत पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. जागेची निश्चिती झाल्याने आता विमानतळ विकास कंपनीची बैठक बोलविण्यात येणार आहे. त्यानंतर जागेबाबत देण्यात येणारे पॅकेज, पुनर्वसन त्याचप्रमाणे विमानतळ उभारणीचा कालावधी आदी सर्व गोष्टींबाबत निर्णय घेण्यात येईल.