दोनशेहून अधिक चित्रपटांची पर्वणी असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) जागतिक स्पर्धात्मक विभागात १४ चित्रपटांची, तर मराठी स्पर्धात्मक विभागातील ७ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. ८ जानेवारी रोजी ‘पिफ’च्या उद्घाटन कार्यक्रमानंतर अब्दररेहमान सिसाको दिग्दर्शित फ्रान्सच्या ‘टिंबक्टू’ चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. पहिल्या महायुद्धाच्या शताब्दीपूर्तीनिमित्त ‘ग्लोबल वॉर्मिग’, ‘द सायलेंट माऊंटन’, ‘द वूड्स आर स्टील ग्रीन’ हे चित्रपट, तर बर्लिन भिंत पडल्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘बर्लिन इज इन जर्मनी’, ‘गुड बाय लेनिन’ आणि ‘द लाइव्हज ऑफ अदर्स’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
जागतिक स्पर्धात्मक विभागात विविध देशांतील सहाशेहून अधिक चित्रपटांनी सहभाग घेतला होता. त्यातून निवड समितीने अंतिम फेरीसाठी १४ चित्रपटांची निवड केली आहे. फोक्सव्ॉगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट स्पर्धात्मक विभागातील ‘लाईव्ह अॅक्शन’ विभागामध्ये ४६ देशांतील १२३ लघुपटांचा सहभाग होता. त्यातील १३ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. अॅनिमेशन विभागात २९ देशांतील ६८ लघुपटांपैकी १२ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे, अशी माहिती पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक चित्रपट (ग्लोबल सिनेमा) विभागात विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेले २८ देशांतील ८० हून अधिक चित्रपट दाखविले जाणार आहेत. ‘कॅलिडोस्कोप’ विभागात जपान, चीन, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि तैवान या देशांतील २० चित्रपटांचा समावेश आहे. ‘कंट्री फोकस’ विभागामध्ये अल्जेरिया, ब्राझील आणि इजिप्त या देशांचे मिळून २० चित्रपट पाहता येणार आहेत. ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ विभागामध्ये भारतातील ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चटर्जी, पोलंडचे दिग्दर्शक ख्रिस्तोफ झानुसी आणि पेरू देशातील दिग्दर्शक फ्रान्सिस्को लोम्बार्डी यांचे चित्रपट दाखविले जाणार आहेत. या महोत्सवासाठी ख्रिस्तोफ झानुसी (पोलंड), किरण नगरकर (भारत), फर्नाडो कोलोमो (स्पेन), हेल्मूट ग्रोशप (ऑस्ट्रिया), मार्सेल गिस्लर (स्वित्र्झलड), माकरे पिसोनी (इटली), पिटर टॉईन्स (जर्मनी) आणि नंदना सेन (अमेरिका) हे आंतरराष्ट्रीय ज्युरी आहेत.
मराठीतील सात चित्रपट
महोत्सवातील मराठी स्पर्धात्मक विभागामध्ये ४८ चित्रपटांनी सहभाग घेतला होता. निवड समितीने ‘एक हजाराची नोट’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘किल्ला’, ‘ख्वाडा’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘सलाम’ आणि ‘यलो’ या ७ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरी मंडळ हे चित्रपट पाहणार असून, राज्य सरकारतर्फे ‘संत तुकाराम’ सवरेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारासह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सवरेत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनय, पटकथा आणि छायाचित्रण अशा पुरस्कारांची निवड केली जाणार आहे.