पुण्यातील रविवार पेठ येथील राठोड ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या कामगाराने मालकाला तब्बल ८८ लाखांचा गंडा घातला आहे. मागील वर्षीच्या जुनपासून ते या वर्षीच्या जूलैपर्यंत कामगाराने दुकानातील ३३७ तोळे सोने चोरी केल्याचे उघडकीस आले. जितेंद्र रतनचंद सिंघवी असे या कामगाराचे नाव असून तो फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज युवराज राठोड यांच्या रविवार पेठेतील राठोड ज्वेलर्स येथे जितेंद्र रतनचंद सिंघवी मुळचा राजस्थान येथील राहणार आहे. तो या दुकानात ३ वर्षांपासून कामाला होता.

या दुकानात तो बऱ्याच दिवसांपासून काम करत असल्याने त्याच्यावर मालकाचा आधिक विश्वास होता. जितेंद्रकडे वर्षभरापूर्वी नेकलेसच्या काऊंटरवरील जबाबदारी दिली होती. दररोज काऊंटरची ताळेबंद देताना स्टॉक असल्याचे तो सांगायचा. मात्र तो १९ जुलै रोजी अचानक सुट्टीवर गेला. तेव्हा स्वत: मालकांनी सर्व काऊंटरवरील दिवसभराचा स्टॉक चेक केला. त्यावेळी नेकलेस काऊंटरवर तब्बल ३६ नेकलेस कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मालकाने जितेंद्रला फोन केला. यावेळी त्याने वडील आजारी असल्याचे कारण देत दोन दिवसांत परतणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याशी फोन केला असता फोन ऑफ करून ठेवला. त्यानंतर तो यापूर्वी राहत असणाऱ्या मीरा भाईंदर येथील घरी जाऊन देखील पाहणी करण्यात आली. एकवर्षांच्या काळात जितेंद्रने तब्बल ३३७ तोळ्यांची चोरी केली असून या एवजाची किंमत ८८ लाख ६५ हजार इतकी आहे. संबंधिताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.