डॉ. प्रभा अत्रे यांची भावना
सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेतही किराणा घराणे अग्रेसर आहे. सामान्य माणसालाही संगीत निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याची ताकद किराणा घराण्यामध्ये आहे हे सिद्ध झाले आहे. किराणा घराण्यालाच भारतरत्न या सर्वोच्च किताबाचा बहुमान लाभला, अशी भावना ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी रविवारी व्यक्त केली.
पुणे महापालिकेतर्फे महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते डॉ. प्रभा अत्रे यांना स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ संगीतकार रवी दाते आणि माजी उपमहापौर आबा बागूल या वेळी उपस्थित होते. घरामध्ये संगीताचा वारसा नव्हता. स्वरांच्या मार्गावर पाऊल कधी पडले हे कळलेच नाही, असे सांगून डॉ. अत्रे म्हणाल्या, शास्त्रीय संगीताविषयी मी जे काही लेखनातून मांडले त्या गोष्टी आज सिद्ध होत आहेत. अन्य घराण्यांप्रमाणे किराणा घराण्याला अधिकारवाणीने बोलणारी आणि लिहिणारी माणसे लाभली नाहीत. त्यामुळे किराणा घराण्याच्या गायकीबद्दल गैरसमज पसरण्यास मदत झाली. विज्ञान आणि कायद्याची विद्यार्थिनी असल्यामुळे अगदी परंपरेसह प्रत्येक गोष्टीकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहण्याची सवय जडली. त्यामुळे जे पटले आणि अनुभवले ते ठामपणाने मांडत आले आहे. त्यासाठी मला खूप त्रास सहन करावा लागला.

अप्रिय गोष्टी विसरायच्या असतात
गेल्या वर्षीच्या आठवणी पुसून टाकल्या असल्या तरी खुणा बाकी आहेत. मात्र, अप्रिय गोष्टी विसरून जायच्या असतात. हा पुरस्कार पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने दिला जात आहे याचा विशेष आनंद आहे. बाहेरच्या व्यक्तींनी कितीही सन्मान केले तरी आपल्या माणसांनी पाठीवरून कौतुकाचा हात फिरविल्याचा आनंद लाभला आहे, अशा भावना व्यक्त करीत डॉ. प्रभा अत्रे यांनी या पुरस्काराच्या विलंबासंदर्भात मार्मिक टिप्पणी केली.