जंगलीमहाराज रस्त्यावरील कोटय़वधींचा खर्च वाया जाण्याची शक्यता

कोटय़वधी रुपये खर्च करून जंगलीमहाराज रस्त्याची पुनर्रचना करण्यात येत असली तरी मेट्रो प्रकल्पाअंतर्गत या रस्त्यावर प्रस्तावित स्कायवॉकमुळे जंगलीमहाराज रस्त्याची पुन्हा मोडतोड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशस्त पदपथ, पर्जन्यजल पुनर्भरण यंत्रणा (रेन वॉटर हार्वेस्टिंग), सायकल ट्रॅक यासह ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आसन व्यवस्थेवर केलेला खर्च वाया जाणार असून मॉडेल रोड या संकल्पनेचा बोऱ्या वाजणार आहे.

जंगलीमहाराज रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. महापालिका निवडणुकीची धामधुम सुरू असताना हे काम सुरू करण्यात आले. प्रारंभी अर्बन गाईडलाईन्स डिझाईन अंतर्गत या महत्त्वाच्या रस्त्याची पुनर्रचना करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात आला होता. मॉडर्न कॅफे चौक ते डेक्कन जिमखाना येथील गरवारे पुलापर्यंत टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात येणार आहे. हा रस्ता शहरातील मॉडेल रोड ठरेल, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात येत होता. वास्तविक स्मार्ट सिटी योजनेअंर्तगत औंध परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या मॉडेल रोड या संकल्पनेला विरोध झाल्यामुळे ही संकल्पना जंगली महाराज रस्त्यावर विकसित करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे.

स्मार्ट सिटीतील या संकल्पनेचा खर्चही महापालिकेच्या पथ विभागाकडूनच होणार आहे. त्यामुळे पुनर्रचनेच्या नावाखाली सुस्थितीत असलेल्या रस्त्याची मोडतोड प्रशासनाकडून करण्यात आली. सध्या यातील काही काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी कसा उपयुक्त आहे, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुळातच पुनर्रचना करताना या रस्त्याची रुंदी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. पदपथ, सायकल ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पर्जन्यजल पुनर्भरण योजना अशी काही कामे या रस्त्यावर करण्यात आली आहेत. पादचाऱ्यांना प्रशस्त पदपथ उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे हा रस्ता विनाअडथळा असल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात ही सर्व सुविधा काही कालावधीपुरतीच राहणार आहे. मेट्रो प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित स्कायवॉकमुळे या रस्त्यावर पुन्हा मोडतोड करावी लागणार आहे. महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. मात्र मेट्रो प्रकल्प होणार म्हणून विकासकामे थांबविता येणार नाहीत, असा दावा करण्यात आला आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या कामास महामेट्रोकडून सुरुवात झाली आहे. प्रस्तावित मेट्रो प्रकल्प, त्याची कामे, वेळापत्रक, प्रवासीकेंद्रित सुविधांची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे. शहरात होणाऱ्या तीन मेट्रो मार्गिका या शिवाजीनगर येथील शासकीय गोदामाच्या जागेवर एकत्रित येणार आहेत. या ठिकाणी जमिनीखाली, जमिनीवर समांतर आणि उन्नत (इलेव्हेटेड) मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहे. शहराच्या मध्यवस्ती भागात स्काय वॉक उभारण्याचा प्रस्तावही महामेट्रोकडून करण्यात आला आहे. त्यानुसार डेक्कन, जंगलीमहाराज रस्ता आणि फग्र्युसन रस्ता येथे स्कायवॉक उभारण्यात येणार असून ते एकमेकांना परस्परांशी जोडण्यात येणार आहेत. शिवाजीनगर धान्य गोदामापर्यंत प्रवाशांना जाता येणार असून मध्य भागातील प्रवासी मेट्रोतून हव्या असलेल्या ठिकाणी प्रवास करू शकणार आहेत. जंगलीमहाराज रस्ता, फग्र्युसन रस्त्याबरोबर मध्यवस्तीतील नागरिकांना स्कायवॉकद्वारे मेट्रोशी जोडण्यात येणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

मेट्रोच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर आणि महामेट्रोकडे त्याचे काम सोपविण्यात आल्यानंतर महापालिकेकडून जंगलीमहाराज रस्त्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत असले तरी स्मार्ट सिटीमधील मॉडेल रोड ही संकल्पना पूर्ण करण्याच्या अट्टाहासापायीच या रस्त्यावर कोटय़वधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मेट्रोच्या नियोजित स्कायवॉकमुळे ही संकल्पनाही बासनात जाणार असून जंगलीमहाराज रस्त्याचे काय होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

वाहतूक कोंडीचा त्रास

मॉडेल रोड अंतर्गत पादचाऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच रस्त्याची रुंदीही कमी करण्यात आलेली नाही असे सांगण्यात येत आहे. पदपथ प्रशस्त झाले असले तरी या पदपथांवर अतिक्रमणे होण्याचा धोका वाढला आहे. फेरीवाले, छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांकडून पदपथांचा ताबा घेण्यात आल्याचे चित्र आहे. यापूर्वी रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहने पार्क करण्यात येत होती. आता ही वाहने पीएमपीच्या बसथांब्याच्या मागेपुढे पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अधिकच त्रासदायक असलेल्या या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा अनुभवही वाहनचालक घेत आहेत.