पुण्यातील मार्गिकेचे भूगर्भीय सर्वेक्षण

पिंपरी-चिंचवड शहरात सुरू झालेल्या मेट्रो उभारणीच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची (सीओईपी) नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाचे काम महामेट्रोकडून होणार आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला आहे. तर पुण्यातील मार्गिकेचे भूगर्भीय सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. मेट्रोची कामे वेगात सुरू झाल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा वाहतूक व्यवस्थेवर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी हा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

मेट्रोचे काम सुरू असताना वाहतूक व्यवस्थापन सल्लागार म्हणून सीओईपी महामेट्रोला मदत करणार असून वाहतूक व्यवस्थापनाचा प्राथमिक आराखडा सीओईपीने तयार करून महामेट्रोस दिला आहे. हा आराखडा येत्या काही दिवसांमध्ये पोलिसांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

ज्या भागात मेट्रोचे काम सुरू असेल, त्या ठिकाणच्या वाहतुकीची संपूर्ण शास्त्रीय माहिती आणि भविष्यातील वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करणे या आराखडय़ाअंतर्गत अपेक्षित आहे. वाहतूक कोडींचा प्रवासी वाहतुकीवर होणारा परिणाम टाळण्यासाठी सर्वोत्तम संभाव्य उपाय शोधण्याचा देखील विचार महामेट्रोकडून सुरू झाला आहे. ज्यामध्ये मुख्य मार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यांवरून वळविणे आणि बीआरटीच्या मार्गिकेमधून दुचाकी वाहतूक वळविणे या सारख्या उपाययोजनांवर वाहतूक पोलिसांसमवेत चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले.