पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे वाहतुकीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तीनपदरीकरणाच्या प्रकल्पाची पूर्तता अत्यंत आवश्यक असताना मागील २० ते २५ वर्षांपासून त्याबाबत मागणी करूनही अद्याप हा प्रकल्प मंजुरीच्या यार्डातच अडकला आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम झालेले आहे, मात्र प्रत्यक्ष कामासाठी रेल्वे खात्याची मंजुरीच मिळत नसल्याने प्रकल्पाची गाडी जागेवरच अडकून पडली आहे. विस्ताराच्या प्रकल्पाला उशीर होत असताना त्याच्या नियोजित खर्चामध्येही सातत्याने वाढ होत आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनीही या प्रकल्पाच्या मंजुरीच्या कालावधीबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
मुंबई, नवी- मुंबई, पनवेल व पुणे शहराचा झपाटय़ाने विस्तार होत असताना पुण्यातून मुंबईला रोजच जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्याचप्रमाणे पुणे- लोणावळा दरम्यान िपपरी- चिंचवड त्याचप्रमाणे मावळ भागातही नागरिकीकरण मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने पुणे- लोणावळा लोकलच्या गर्दीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे पुणे- लोणावळा- मुंबई या टप्प्यात रेल्वे वाहतुकीची मागणी वाढली आहे. पुणे- लोणावळा दरम्यान लोकलची संख्या वाढविणार असल्याचे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी जाहीर केले असले, तरी सध्या या मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांची संख्या लक्षात घेता रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यावर मर्यादा येणार असल्याचे स्पष्ट आहे.
पुणे- लोणावळासह पुणे- मुंबई मार्गावर रेल्वेची संख्या वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, दुहेरी लोहमार्गाच्या मर्यादा लक्षात घेता याही गाडय़ांची संख्या वाढविणे शक्य झालेले नाही. त्यामुळे पुणे ते मुंबई दरम्यान गाडय़ांची संख्या वाढवून प्रवाशांना अधिक चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तीनपदरीकरणाची नितांत आवश्यकता आहे.
पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन २० वर्षांपासून करण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या रेल्वे मंत्रीपदाच्या काळात या मार्गाच्या सर्वेक्षणाचा विषय घेण्यात आला होता. त्या वेळी सर्वेक्षणही झाले. त्यानंतर पुन्हा पाच वर्षांनी याच मार्गाच्या सर्वेक्षणाचा विषय समोर आला. त्यानुसार पुन्हा या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात आले. पण, केवळ सर्वेक्षणावरच ही गाडी अडली आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात जागा ताब्यात घेण्यापासून नद्यांवर नवे पूल उभारण्यापर्यंतचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे त्याला मोठा कालावधी लागणार आहे, मात्र प्रकल्पाला मंजुरीच मिळत नसल्याने सर्वच अडून बसले असून, प्रकल्प प्रत्यक्षात येण्याचा कालावधीही लांबत चालला आहे. त्याबरोबरीने या प्रकल्पावर केल्या जाणाऱ्या नियोजित खर्चाचा आकडाही वाढत चालला आहे. या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळवून घेण्यासाठी पुणे विभागातील खासदारांनी प्रयत्न करायला हवेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
मंजुरी केव्हा सांगता येणार नाही- सुनीलकुमार सूद
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी नुकतीच पुणे स्थानकाला भेट दिली. त्या वेळी पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तीनपदरीकरणाबाबत विचारले असता, ‘आमच्या दरवर्षीच्या मागणीमध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे आम्ही करतो. मात्र, अद्याप या प्रकल्पाच्या कामाला मंजुरी मिळालेली नाही, ती कधी मिळेल, हे सांगता येणार नाही’, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.