दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल कायम

पुण्याहून मुंबईला सकाळी जाणाऱ्या गाडय़ांना सुपरफास्ट दर्जा असला, तरी कर्जतनंतर लोकल आणि इतर गाडय़ा पुढे सोडल्या जात असल्याने मुंबईत पोहोचेपर्यंत या गाडय़ांची बैलगाडी होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पुणे- मुंबई दरम्यान नोकरीच्या निमित्ताने रोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल कायम आहेत.  पुणे स्थानकावरून गाडय़ा एक क्रमांकाच्या फलाटावरून सोडून त्या वेळेत मुंबई पोहोचविण्यासाठी प्रवाशांनी आंदोलन केले. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट, न्याय्य मागण्यांच्या या आंदोलनाला ‘राष्ट्रविरोधी कृत्य’ संबोधण्यात आले.

पुण्यातून रोज सकाळी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, त्यात प्रामुख्याने मुंबईत शासकीय, निमशासकीय संस्था, न्यायालय आणि खासगी आस्थापनांमध्ये नोकरीवर जाणाऱ्यांची आणि व्यावसायिकांची संख्या लक्षणीय आहे. पुणे स्थानकावरून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सिंहगड एक्स्प्रेस, सकाळी सव्वासातला डेक्कन क्वीन, तर सकाळी सात वाजून ५० मिनिटांनी प्रगती एक्स्प्रेस मुंबईकडे सोडली जाते. रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना पुणे शहर आणि उपनगराच्या विविध भागातून स्थानकापर्यंत येऊन मुंबईत पोहोचण्यासाठी डेक्कन क्वीन सोयीची आहे. त्यामुळे या गाडीला चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक आहे.

सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास डेक्कन क्वीन मुंबईत पोहोचल्यास नोकरीच्या ठिकाणी पोहोचणे सोयीचे होते. मात्र, डेक्कन क्विन सकाळी सव्वासातला सुटूनही बहुतांश वेळेस अकरानंतरच पोहोचते. डेक्कन क्वीन किंवा मुंबईत जाणाऱ्या इतर कोणत्याही गाडय़ा कर्जतपर्यंत सुपरफास्ट म्हणूनच धावतात. पण, कर्जतच्या पुढे गाडय़ा निघाल्यानंतर लोकल गाडय़ा या मार्गावर टाकल्या जातात. त्यासाठी सुपरफास्ट गाडय़ांनाही थांबवून ठेवले जाते. हा प्रकार रोजचाच झाल्यामुळे डेक्कन क्वीनसह सर्व गाडय़ांची अवस्था बैलगाडय़ांप्रमाणेच झाली आहे. डेक्कन क्वीन वेळेत मुंबईत पोहोचवावी आणि पुण्यातून ती फलाट क्रमांक एकवरून सोडण्यात यावी, अशी मागणी करीत काही दिवासंपूर्वी पुणे स्थानकावर रोजच्या प्रवाशांनी गाडी रोखली. या आंदोलनाला रेल्वेच्या वरिष्ठांनी ‘राष्ट्रविरोधी कृत्य’ संबोधून प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतून पुण्यात येणाऱ्या गाडय़ा मात्र वेळेत

पुण्याहून सकाळी मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाडय़ा कधीच वेळेत मुंबईत पोहोचत नसल्याचा अनुभव आहे. मात्र, मुंबईतून सकाळी पुण्याकडे येणाऱ्या गाडय़ा वेळेत दाखल होतात. इंद्रायणी एक्स्प्रेस मुंबईतून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटून पुण्यात सकाळी सव्वानऊला पोहोचते. इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ६.४५ वाजता सुटून पुण्यात सकाळी ९.५७ वाजता पोहोचते. डेक्कन एक्स्प्रेस सकाळी सात वाजता सुटून पुण्यात सकाळी ११.०५ वाजता पोहोचते. इंटरसिटी संध्याकाळी ५.५५ वाजता परतते, तर इंद्रायणी संध्याकाळी ६.३५ वाजता परतते.  पुण्यातून मुंबईला सकाळी जाणाऱ्या गाडय़ा कर्जतच्या पुढे गेल्यास त्यांना वेगळा न्याय लावला जातो. या गाडय़ा थांबवून लोकल पुढे सोडल्या जातात.

पाच दिवस मुंबईत राहणे शक्य नसलेल्या नोकरदार वर्गाला पुणे- मुंबई रोजच्या प्रवासासाठी सकाळच्या डेक्कन क्वीनचाच आधार आहे. मात्र, ही गाडी कधीच वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे अनेकांवर कार्यालयीन कारवाई होते. कायद्यानुसार सुपरफास्ट गाडय़ांना मार्ग करून देणे अपेक्षित असताना कर्जतनंतर लोकल गाडय़ांसाठी सुपरफास्ट गाडय़ा थांबविल्या जातात. मात्र, हाच न्याय मुंबईतून सकाळी पुण्यात येणाऱ्या किंवा संध्याकाळी मुंबईत जाणाऱ्या गाडय़ांना लावला जात नाही.

हर्षां शहा, अध्यक्ष रेल्वे प्रवासी ग्रुप