बाहेरच्या पक्षातून घेतलेले उमेदवार, तिकिट वाटपात झालेला गोंधळ, निष्ठावान कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय, पक्षात गुंडांना दिलेला प्रवेश, आरोप-प्रत्यारोप या सर्वांवर मात करत भाजपने अखेर पुण्यात सर्वाधिक ९८ ठिकाणी विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये १६२ जागांपैकी ९८ जागी भाजप, ४० ठिकाणी राष्ट्रवादी, ११ ठिकाणी काँग्रेस, १० जागांवर शिवसेना, २ ठिकाणी मनसे विजयी ठरली आहे. एमआयएमने १ जागा जिंकत पुणे महापालिकेत प्रवेश केला आहे. मतमोजणीच्या आदल्या दिवशी भाजपला सर्वाधिक जागा न मिळाल्यास सक्रिय राजकारण सोडण्याची घोषणा करणाऱ्या खासदार संजय काकडे यांना पुणेकरांनी तारले आहे. दहा वर्षांत पुणे शहरात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनता पुन्हा आपल्याला सत्ता देईल या भ्रमात असलेल्या राष्ट्रवादीला जनतेने पराभवाची चव चाखायला लावली.

या निवडणुकीने अनेकांना घरचा रस्ता दाखवला. पक्षाचे गटनेते गणेश बीडकर यांचा काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी पराभव केला. याशिवाय उपमहापौर मुकारी अलगुडे, मनसेच्या रूपाली पाटील, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके आणि नगरसेवक राजू पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे विजयी ठरले. सभागृह नेते बंडू केमसे, मनसेचे गटनेते अॅड.किशोर शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ या सर्वांनाही पराभवाचा धक्का मिळाला. शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांचे चिरंजीव नगरसेवक सनी निम्हण यांचा पराभव चर्चेचा विषय ठरला.

प्रभाग क्र. १० मध्ये बंडू केमसे आणि किशोर शिंदेंना भाजपच्या किरण दगडेंनी अस्मान दाखवलं. सेनेच्या अशोक हरणावळ आणि राष्ट्रवादीच्या विनायक हनमघर यांचा भाजपच्या महेश लडकत यांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १८ मधून सर्वसाधारण जागेवरून लढविणार्‍या पहिल्या महिला महापौर विद्यमान नगरसेविका कमल व्यवहारे यांना सम्राट थोरात यांनी हरवलं. थोरात यांनी भाजपमध्ये अखेरच्या क्षणी प्रवेश मिळवला होता.

सहकारनगरमध्ये माजी सभागृह नेते सुभाष जगताप व शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणारे नगरसेवक शिवलाल भोसले यांना भाजपच्या महेश वाबळेंनी कात्रजचा घाट दाखवला. वडगाव धायरी-वडगाव बुद्रुक या प्रभाग क्र. ३३ मध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक विकास दांगट यांच्यावर भाजपचे राजाभाऊ लायगुडे यांनी विजय मिळविला.

पुणे महानगरपालिकेची निवडणूक यंदा सर्व राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती.मात्र मतदार राजाने भाजपवर विश्वास दाखवीत महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. भाजपने निवडणुकांच्या तोंडावर मेट्रोच्या कामाचं भूमिपूजन करून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला खरा पण प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात गर्दीअभावी रद्द करावी लागलेली मुख्यमंत्र्यांची सभा विनोदाचा विषय झाली होती.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर यंदा राष्ट्रवादीचे नेते योग्य तयारी करून उतरले होते. अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या सभांना चांगला प्रतिसादही मिळाला होता. परंतु हा प्रतिसाद मतपेटीतून त्यांना मिळू शकला नाही. त्यामुळे मोठी अपेक्षा ठेवून असलेल्या राष्ट्रवादीला निराशेला सामोरे जावे लागले.

पुण्यात काँग्रेसला आलेली मरगळ अजूनही कायम आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे २९ नगरसेवक होते. यंदा त्यामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.