सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

महापालिका हद्दीमध्ये केवळ अकरा गावे घेण्याऐवजी सर्व चौतीस गावांचा समावेश करावा. टप्प्याटप्प्याने तेवीस गावांचा समावेश होणार असल्यामुळे शहराचा एक विकास आराखडा करण्यास अडचणी येणार असून पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये सुसूत्रता येणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गावे समाविष्ट करण्याचा राज्य शासनाचा निर्णय आत्मघातकी ठरेल, अशा शब्दात या निर्णयावर टीका करण्यात आली.

महापालिका हद्दीमध्ये अकरा गावे समाविष्ट करण्यात येणार असून त्याबाबतची अधिसूचना डिसेंबर अखेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे पूर्णपणे तर अंशत: महापालिका हद्दीत असलेल्या नऊ गावांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य सभेत गुरुवारी या विषयावर चर्चा करतानाच सर्व चौतीस गावांचा समावेश महापालिकेत करावा, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली.

समावेश न झालेल्या गावांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. महापालिका हद्दीमध्ये ही गावे येणार या चर्चेमुळे त्यांना निधी मिळाला नव्हता. खराब रस्ते, पाणीपुरवठय़ाची अपुरी सुविधा अशी या गावांमधील परिस्थिती आहे. दवाखाने, रस्ते, मोकळ्या जागा या गावांमध्ये उरलेल्या नाहीत. अनधिकृत बांधकामांचाही काही प्रमाणात या गावांमध्ये प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर तोडगा काढण्यासाठी सर्व चौतीस गावांचा समावेश करणेच योग्य आहे. ही सर्व गावे महापालिका हद्दीमध्ये आली तर संपूर्ण शहराचा एकच विकास आराखडा करता येणे शक्य आहे. विकासाच्या दृष्टीनेही ते उपयुक्त ठरेल. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, वाहतुकीसंदर्भात सुसूत्रता येईल. अन्यथा शहरावरच त्याचा ताण पडेल. त्यामुळे केवळ अकरा गावे घेण्याचा हा निर्णच चुकीचा आहे, अशी मते यावेळी मांडण्यात आली.

गावांचा समावेश झाल्यामुळे तीस टक्के भाग वाढला आहे. समाविष्ट गावांतील लोकसंख्या कमी असली तरी या गावांचे क्षेत्रफळ जास्त आहे. त्यामुळे जीएसटीपोटीच्या (वस्तू सेवा विधेयक-गुड्स सव्‍‌र्हिस टॅक्स) अनुदानातही वाढ झाली पाहिजे. त्यामुळे महापालिकेने तशी मागणी राज्य शासनाकडे करावी. लोकसंख्येच्या आधारावर उत्पन्न निश्चित झाल्यास महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसेल, असे नगरसेवक सुभाष जगताप यांनी निदर्शनास आणून दिले.