महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना अद्यापही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षाबाबतचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे विधानसभेत महायुतीचा घटक असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप आणि भारतीय संग्राम परिषद या  पक्षांनी एकत्रित येत भारतीय जनता पक्षाला प्रस्ताव देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत या घटकपक्षांची बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर कुणाला किती जागा मिळणार आहेत, याबाबत खुलासा केला जाणार आहे.

खासदार राजू शेट्टी, विनायक मेटे आणि महादेव जानकर यांची २८ जानेवारी रोजी पुण्यात बैठक होणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप आणि शिवसंग्राम हे पक्ष एकत्रितपणे सामोरे जाणार आहेत. या निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांनी भाजपला एकत्रित प्रस्ताव दिला आहे. भाजपच्या उत्तरानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे या तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे, रासपचे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे, किरण शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. आगामी निवडणुकांसाठी जागांचा एकत्रित प्रस्ताव भाजपला दिला आहे. यासंदर्भात भाजपकडून मिळणाऱ्या प्रतिसादानंतर घटक पक्ष निवडणुकीची भूमिका ठरविणार आहे. संपूर्ण जिल्हयात पक्षाला चांगल्या प्रकारे वातावरण असून मागणी नुसार जागा वाटप होईल अशी अपेक्षा या तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आली.